esakal | पेच वाढणार ः शिवसेनेत परतण्याबाबत त्या नगरसेवकांनी घेतली ही भूमिका
sakal

बोलून बातमी शोधा

Parner's Shiv Sena corporators took this stand

परत शिवसेनेत पाठवा असा फोन मिलिंद नार्वेकर यांनी पवार यांना केल्याची चर्चा आहे. त्यामुळे आता हे नगरसेवक परत पाठविले जाणार का...त्यांना काय वाटतंय

पेच वाढणार ः शिवसेनेत परतण्याबाबत त्या नगरसेवकांनी घेतली ही भूमिका

sakal_logo
By
मार्तंड बुचुडे

पारनेर : पारनेर नगरपंचायतीच्या पाच नगरसेवकांनी शिवसेना सोडून आमदार नीलेश लंके यांचे नेतृत्व मान्य करत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बारामती येथे प्रवेश केला. या प्रवेशाने केवळ पारनेर तालुक्यातील राजकराण नव्हे तर थेट राज्य पातळीवरील राजकारणात त्याचे चांगलेच पडसाद उमटले आहेत. त्यामुळे राज्यातील राजकारण तापले आहे. 

राष्ट्रवादी काँग्रसेमध्ये प्रवेश दिलेल्या त्या नगरसेवकांना परत शिवसेनेत पाठवा असा फोन मिलिंद नार्वेकर यांनी पवार यांना केल्याची चर्चा आहे. त्यामुळे आता हे नगरसेवक परत पाठविले जाणार का आणि राष्ट्रवादीने जर त्यांना माघारी पाठवले तर संबंधितांची माघारी जाण्याची मानसिकता आहे का, या बाबत ई सकाळने संबंधित नगरसेवक व इतर पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधला असता त्यांनी खालीलप्रमाणे मत व्यक्त केले.

हेही वाचा - दफनविधी केल्यानंतर घरातील सापडले चार बाधित  

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राहून आमदार लंके यांच्या नेतृत्वाखाली काम करू, त्यासाठी नगरसेवकपदाचा राजीनामा द्यावा लागला तरी चालेल, असा पवित्रा अाता या नगरसेवकांनी घेतला आहे.

डॉ.मुद्दस्सीर सय्यद-
आम्ही शिवसेना सोडली आहे. अाता पुन्हा शिवसेनेत जाणे शक्यच नाही. जर आम्हाला शिवसेनेत परत जाण्यास सांगितले तर आम्ही आमची कैफायत थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर मातोश्रीवर जाऊन मांडू. आम्ही शिवसेना पक्षावर नाराज नाही, तर स्थानिक नेतृत्वावर नाराज आहोत. मुळात पक्षाच्या स्थानिक नेतत्वाच्या हुकूमशाहीमुळे आम्ही बाहेर पडलो आहेत. आमदार लंके यांनाही त्याच कारणातून पक्षातून बाहेर काढले गेले आहे. मध्यंतरी नगरपंचायतीमध्ये सत्ता बदल झाला, तो केवळ स्थानिक नेतृत्वावर असलेली नाराजी हेच कारण होते. आम्हाला स्थानिक प्रश्न महत्वाचे आहेत, ते सुटावेत ही अपेक्षा आहे. त्यासाठी पक्षबदल केला आहे.

वैशाली औटी
आम्ही अाता घेतलेला निर्णयावर ठाम आहोत. अाता वेळ पडली तर नगरसेवकपदाचा राजीनामा देऊ. मात्र, आम्ही अाता पुन्हा शिवसेनेत माघारी जाऊन प्रवेश करणार नाही. या पुढे काहीही झाले तरी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडणार नाही. या पुढील काळात आम्ही आमदार लंके यांच्यासोबतच काम करणार आहोत.

नंदा देशमाने 
आम्ही सर्वांनी घेतलेला निर्णय योग्य आहे. अाता तो निर्णय पुन्हा फिरवणे शक्य नाही. नगरसेवकपद महत्वाचे नाही तर शहरातील जनतेची कामे व शहराचा विकास  महत्वाचा आहे. आम्ही स्थानिक नाराजीतून शिवसेनेतून बाहेर पडलो आहोत. यात अाता बदल होणे शक्य नाही. या पुढील काळात काहीही झाले तरीही पुन्हा माघारी जाणे होणार नाही. आम्हाला राष्ट्रवादीसोबत राहायचंय.

नंदकुमार देशमुख 
अाता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आमचा पक्ष प्रवेश झाला आहे. अाता मागे कसे जाणार. हा काही किराणा माल नाही की तो मागे देता येईल. आमचे शिवसेनेच्या पक्ष नेतृत्वाशी भांडण नाही तर आमचे भांडण स्थानिक नेतृत्वाशी आहे. अाता त्यांच्याबरोबर जमणे शक्य नाही. आम्हाला नगरपंचायतीच्या आगामी निवडणुकीत उमेद्वारी मिळाली नाही तरी चालेल मात्र अाता पुन्हा माघार नाही.

किसन गंधाडे
आमच्यावर स्थानिक नेतृत्वने किती अन्याय केला याचा पाढा मुंबईला जाऊन पक्ष श्रेष्टींना सांगू. आमचे नगरसेवकपदाचे राजीनामेही आम्ही देण्यास तयार आहोत. मात्र, अाता माघारी जाणार नाही. आमचा स्थानिक नेतृत्वास विरोध आहे. आम्ही या पुढील काळात आमदार लंके यांच्यासोबत काम करू. त्यांच्याबरोबर राहूनच शहराचा पाणी प्रश्न सोडविणार आहोत. शहरातील इतर विकासकामे करून घेणार आहोत. त्या मुळे अता बदल शक्य नाही.

अशा प्रकारे शिवसेनेतून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेल्या सर्वच नगरसेवकांनी अाता आम्ही आमच्या निर्णयावर ठाम आहोत, अशा प्रतिक्रिया  ई सकाळशी बोलताना दिल्या आहेत.