पारनेरचा जवान आसाममध्ये हुतात्मा...आज येणार होता सुट्टीवर

मार्तंड बुचुडे
Saturday, 8 August 2020

भरत हे दोन वर्षांनंतर निवृत्त होणार होते. सध्या ते नायब पदावर कार्यरत होते. त्यांच्यामागे पत्नी, एक मुलगी , आई-वडील व एक भाऊ आहे. त्यांचे आईवडील शेती करतात. भरत हे आज (ता. 8 ) गावी सुट्टीवर येणार होते.

पारनेर ः आसाममधील तेजपूर येथे सैन्यात सेवा बजावत असणारे भरत लक्ष्मण कदम हे सुट्टीवर येणार होते. मात्र, त्यापूर्वीच मृत्यूने त्यांना गाठले. कवायत करीत असताना त्रास होऊ लागल्याने त्यांना दवाखान्यात दाखल करण्यात आले. मात्र, त्यांचा हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू  झाला. त्यांचे लष्करी सेवेतील हे 17 वर्ष होते, अशी माहिती त्यांचे धाकटे बंधू रामदास कदम यांनी ई-सकाळशी बोलताना दिली. 

भरत कदम हे 2003 साली लष्करात दाखल झाले होते. ते  आसाम येथील तेजपूर येथे सेवा बजावत होते. सध्या ते  नायक पदावर कार्यरत होते. शुक्रवारी (ता. 7 ) सकाळी दैनंदिन कवायतीचा सराव करीत असतानाच त्यांना अचानक त्रास होऊ लागला. त्यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना जवळच्या आर्मी हॉस्पिटलमध्ये व नंतर दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये नेत असताना त्यांची वाटेतच प्राणज्योत मालवली. त्यांचा अंत्यविधी रविवारी (ता. 9 ) सकाळी साडे आकरा वाजता त्यांच्या मूळ गावी पिंपरी जलसेन येथे होणार आहे.

हेही वाचा - विखे-पवार वादावर बोलले रोहित पवार

भरत हे दोन वर्षांनंतर निवृत्त होणार होते. सध्या ते नायब पदावर कार्यरत होते. त्यांच्यामागे पत्नी, एक मुलगी , आई-वडील व एक भाऊ आहे. त्यांचे आईवडील शेती करतात. भरत हे आज (ता. 8 ) गावी सुट्टीवर येणार होते. त्यांची रजाही मंजूरही झाली होती.

मुलीचा वाढदिवस करायचा होता जोरात पण..

आपल्या मुलीच्या पहिल्या वाढदिवसासाठी भरत यांनी रजा काढली होती. त्यांना ही एकुलती एक मुलगी आहे. बऱ्याच वर्षांनंतर मुलगी झाल्याने ते अतिशय आनंदात होते. तिचा वाढदिवस 28 ऑगस्ट रोजी आहे. त्यामुळे तिचा पहिला वाढदिवस धुमधडाक्यात साजरा करावा, यासाठी त्यांनी रजा काढली होती. आज आपल्या मूळ गावी निघणार होते. त्यांनी विमानाचे तिकीटही काढले होते. मात्र, नियतीने त्यांना मुलीचा वाढदिवस साजरा करण्याची संधी हिरावून घेतली. 

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Parner's soldier killed in Assam