नगर शहरातील हा भाग झाला कंटेन्मेंट झोन 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 मे 2020

शहरातील जुन्या भागात कोरोना बाधित रुग्ण आढळण्यास सुरवात झाली आहे. जुन्या मंगळवार बाजारमध्ये एक रिक्षा चालक कोरोना बाधित आढळून आला. आजपासून संपूर्ण शहरातील दुकाने उघडत असली तरी हा परिसर कंटेन्मेंट झोन (प्रतिबंधीत क्षेत्र) करण्यात आला आहे.

नगर : शहरातील जुन्या भागात कोरोना बाधित रुग्ण आढळण्यास सुरवात झाली आहे. जुन्या मंगळवार बाजारमध्ये एक रिक्षा चालक कोरोना बाधित आढळून आला. आजपासून संपूर्ण शहरातील दुकाने उघडत असली तरी हा परिसर 4 जूनपर्यंत कंटेन्मेंट झोन (प्रतिबंधीत क्षेत्र) करण्यात आला आहे. त्यामुळे या परिसरातील कोणतीही दुकाने उघडता येणार नाहीत.

महापालिका प्रशासनाला या भागात जीवनावश्‍यक वस्तू परवाव्या लागणार आहेत. त्या शेजारील भाग बफर झोन करण्याचा आदेश आज जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी महापालिका प्रशासनाला दिला. त्यामुळे जुने नगर शहराचा मोठ्या भागातील दुकाने आज दुपारनंतर प्रशासनाने बंद केली तसेच नागरिकांना घराबाहेर न पडण्यास सांगण्यात आले आहे. 

शहरातील कोरोना बाधित आढळण्यास सुरवात झाली आहे. ही संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. काल (गुरुवारी) रामचंद्र खुंट व जुना मंगळवार बाजारमध्ये प्रत्येकी एक कोरोना रुग्ण आढळून आला. रामचंद्र खुंट परिसर या हॉटस्पॉटमध्ये आहे. जुना मंगळवार बाजार परिसरात कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने हा परिसर आज महापालिका प्रशासनाने सील केला.

जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी आदेश काढून जुना मंगळवार बाजार परिसर कंटेन्मेंट झोन करण्यात आला आहे. हा परिसर सील करण्यात आला आहे. वैद्यकीय सेवा, जीवनावश्‍यक वस्तूंची वाहतूक व वितरण व्यवस्थेशिवाय इतरांना प्रतिबंध करण्यात यावा, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

महापालिका आयुक्‍त हे कंटेन्मेंट झोन व बफर झोनसाठी सनियंत्रण अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. या परिसरातील नागरिकांना जीवनावश्‍यक वस्तू व इतर मदतीसाठी 24 तास सुरू राहील असा कक्ष स्थापन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या परिसरात ये-जा करणाऱ्यांचे थर्मल स्कॅनरद्वारे स्कॅनिंग करण्यात येईल. 

कंटेन्मेंट झोन परिसरात दूध, भाजीपाला, फळे, किराणा, औषधे आदी महापालिका प्रशासन योग्य ते शुल्क आकारून पुरविणार आहे. या क्षेत्रातील बॅंका बॅंकिंग सुविधा बॅंकेच्या प्रतिनिधी मार्फत या परिसरातील नागरिकांना पुरविणार आहे. कंटेन्मेंट झोन व बफर झोनमधील नागरिकांना आपली खासगी वाहने घेऊन घरा बाहेर पडता येणार नाही, असे आदेशात म्हटले आहे. कंटेन्मेंट झोन परिसर संपूर्ण सील करण्यात आला असून केवळ शनी चौकातील रोहित्राजवळील रस्ता जीवनावश्‍यक वस्तू पुरविण्यासाठी खुला ठेवण्यात आला आहे. 

कंटेन्मेंट झोन परिसर 
जुने महापालिका कार्यालय चौक, डॉ. होशिंग हॉस्पिटल चौक, शनी चौक, तख्ती दरवाजा मशीद, आशा टॉकीज, पंचपीर चावडी चौक, अंबिका महिला बॅंक ते जुनी महापालिका चौक. 

 
बफर झोन परिसर 
यतीम खाना बिल्डींग, न्यामत खानी मोहल्ला, निंबाळकर गल्ली, तवकल वस्ताद तालीम, श्रीपाद ग्रंथ भंडार, घुमरे गल्ली, आदर्श शाळा, माणिक चौक, कोतवाली पोलिस ठाणे, बाळासाहेब देशपांडे दवाखाना, नांगरे गल्ली, जुना बाजार रस्ता, पटवेकर गल्ली, फुलसौंदर चौक, शिवम थिएटर, महापालिका अग्निशमन कार्यालय, भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: This part of Ahmednagar city became a containment zone