कोरोनाची भीती झुगारून प्रवासी पुन्हा वळले एसटीकडे

सकाळ वृत्तसेवा
Friday, 11 December 2020

कोरोना विषाणूमुळे लॉकडाउन करण्यात आले होते. या काळात एसटीची सेवाही ठप्प होती. त्यामुळे एसटीचे आर्थिक समीकरण बिघडले. अद्याप ते पूर्वपदावर आलेले नाही.

नगर ः कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाचा राज्य परिवहन महामंडळाला मोठा फटका बसला. एसटीची विस्कटलेली घडी हळूहळू पूर्वपदावर येऊ लागली आहे. जून ते ऑक्‍टोबरदरम्यान एसटीला प्रवाशांचा प्रतिसाद अत्यल्प मिळत असल्याने, फेऱ्यांची संख्या कमी होती. मात्र, नोव्हेंबरपासून प्रवाशांची गर्दी वाढू लागल्याने त्याचा फायदा एसटीला होऊ लागला आहे. 

कोरोना विषाणूमुळे लॉकडाउन करण्यात आले होते. या काळात एसटीची सेवाही ठप्प होती. त्यामुळे एसटीचे आर्थिक समीकरण बिघडले. अद्याप ते पूर्वपदावर आलेले नाही. राज्य शासनाच्या निर्देशानुसार, कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असताना एसटी बस सुरू झाली आहे.

हेही वाचा - शरद पवारांना पंतप्रधान झालेलं पहायचंय

सुरवातीला जून ते ऑक्‍टोबरपर्यंत प्रवाशांचा एसटीला अल्प प्रतिसाद मिळत होता. मात्र, आता प्रवाशांची गर्दी होऊ लागली आहे. गुरुवारी (ता. 10) 390 बसच्या माध्यमातून नगर विभागाने 1170 फेऱ्या केल्या. एक लाख 34 हजार किलोमीटरच्या प्रवासात 56 हजार 737 प्रवाशांना इच्छित स्थळी सोडण्यात आले. त्यातून एसटीला 33 लाखांचे उत्पन्न मिळाले.

जिल्ह्यातील 11 आगारांपैकी तारकपूर आगारातून सर्वाधिक 60 बसच्या माध्यमातून 118 फेऱ्या सुरू आहेत. कोपरगाव आगारातून 47 बसच्या माध्यमातून 152, तर श्रीरामपूर आगारातून 46 बसच्या माध्यमातून 108 फेऱ्या झाल्या आहेत. 

 

प्रवाशांच्या मागणीनुसार एसटी प्रशासनाकडून ग्रामीण भागात फेऱ्या सुरू करण्यात येणार आहेत. प्रवाशांनी त्याचा लाभ घ्यावा. 
- अविनाश कल्हापुरे, व्यवस्थापक, तारकपूर आगार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The passenger turned again to ST