पाथर्डीत तिघांचा बळी घेणारा बिबट्या पकडला? हैद्राबादच्या प्रयोगशाळेत नमुने पाठविले

राजेंद्र सावंत 
Thursday, 5 November 2020

शिरापुरच्या शिवारालालगुन असलेल्या सटवाई दऱ्याच्या भागात सावरगाव (ता. आष्टी) हद्दीत लावलेल्या पिंजऱ्यात एक बिबट्या पहाटे जेरबंद झाला. वनविभागाचे अधिकारी गुरुवारी सकाळी त्याला पिंजऱ्यात घेऊन नगरला गेले.

पाथर्डी (अहमदनगर) : शिरापुरच्या शिवारालालगुन असलेल्या सटवाई दऱ्याच्या भागात सावरगाव (ता. आष्टी) हद्दीत लावलेल्या पिंजऱ्यात एक बिबट्या पहाटे जेरबंद झाला. वनविभागाचे अधिकारी गुरुवारी सकाळी त्याला पिंजऱ्यात घेऊन नगरला गेले. बिबट्याची व बळी पडलेल्या बालकांच्या रक्ताचे नमुने हैदराबादच्या संशोधन प्रयोगशाळेत तपासणीला पाठविण्यात आले आहेत. तेथील अहवाल आल्यानंतरच पकडलेला बिबट्या नरभक्षक आहे की नाही हे समजणार आहे. 

वनविभागाने मायंबा देवस्थानच्या बाजुला असलेल्या डोंगरावर पिंजरा लावला होता. ही हद्द डोंगराच्या पश्चिम बाजुला शिरापुरची आहे व डोंगरमाथ्यावर सावरगावची आहे. बुधवारी रात्री बिबट्याने पिंजऱ्यातील बोकड पंजाने मारले. बोकड खाण्यासाठी बिबट्या पिंजऱ्यात घुसला व जेरबंद झाला. गुरुवारी सकाळी वनविभागाच्या स्थानिक कर्मचाऱ्यांनी बिबट्या जेरबंद झाल्याची बातमी अधिकाऱ्यांना दिली. सकाळी १० वाजता बिबट्याला नगरला हलविण्यात आले. 

पाथर्डी तालुक्यातील तिन बालकांचा बळी बिबट्याने १५ दिवसापुर्वी घेतला आहे. तेव्हापासुन जिल्हा वनसरंक्षक आदर्श रेड्डी, तिसगाव व पाथर्डी वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी, नाशिक, औरंगाबाद, पुणे, नगरचे अधिकारी पाथर्डीत तळ ठोकुन आहेत. रात्रदिवस बिबट्याचा शोध घेण्याचे काम विविध पथके करीत आहेत. एक बिबट्या सापडला असला तरी आणखी नेमके किती बिबटे तालुक्यात आहेत. याचा अंदाज वनविभागालाही देता येत नाही. 

पकडलेला बिबट्या नरभक्षक आहे की नाही याचा अहवाल येण्यासही बराच कालावधी लागेल, अशी माहीती वनविभागाच्या पथकातील माहीतगारांनी दिली. बिबट्या पकडण्यास सुरुवात झाली. यामुळे नागरीकामधेही समाधान वय्क्त केले जात आहे. मात्र अजुनही बिबट्याची दहशत कायम आहे. मढी, शिरापुर, राजंणी, केळवंडी, चेकेवाडी वृद्धेश्वर , करडवाडी सावरगाव या भागात लोक भितीच्या सावटाखालीच दिवसभर शेतीची कामे करतात.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Pathardi taluka a leopard caught the victim of three