esakal | बोंबलत फिरणाऱ्यांना चार लाखांचा दंड

बोलून बातमी शोधा

Penalties for those who walk out even during lockdown
बोंबलत फिरणाऱ्यांना चार लाखांचा दंड
sakal_logo
By
अशोक निंबाळकर

अहमदनगर ः जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या आदेशानुसार शहरात लॉकडाउन करण्यात आले आहे. नियम मोडणाऱ्यांवर महापालिकेची चार दक्षता पथके कारवाई करत आहेत. या पथकाने मागील दीड महिन्यात नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व सोशल डिस्टन्सचे पालन करणाऱ्यांना सुमारे 500 नागरिकांकडून तीन लाख 80 हजार 700 रुपयांचा दंड वसूल केला आहे.

महापालिका आयुक्‍त शंकर गोरे यांनी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईसाठी चार पथके तयार केली आहे. यात परिमल निकम, शशिकांत नजान, संतोष लांडगे व कल्याण बल्लाळ या अधिकाऱ्यांची पथक प्रमुख म्हणून नियुक्‍ती केली आहे. प्रत्येक पथकात सात कर्मचाऱ्यांची नियुक्‍त केली आहे.

यात सहायक आयुक्‍त दिनेश सिनारे, प्रभाग अधिकारी नानासाहेब गोसावी, सूर्यभान देवघडे, नंदकुमार नेमाणे, राहुल साबळे, अमोल लहारे, किशोर जाधव, राजेश आनंद, अमोल कोतकर, अनिल लोंढे आदींचा समावेश आहे. ही पथके पहाटे चारपासून रात्री दहा वाजेपर्यंत कार्यरत असते. शहरात गर्दी होणार नाही, याची ही पथके दक्षता घेत आहेत. शहरातील गर्दी असलेली ठिकाणे, भाजी बाजार, विविध दुकाने, मास्क न लावणारे व रस्त्यावर थुंकणाऱ्या नागरिकांवर ही पथके कारवाई करत आहेत.

16 मार्चपासून ही पथके तैनात केली आहेत. सकाळी सात वाजेनंतर ही पथके शहरातील विविध भागांत कारवाई करतात. पथक दिसताच नागरिक व विक्रेते नियमांचे पालन करण्याचा देखावा करतात. मात्र पथक गेल्यावर पुन्हा काही ठिकाणी गर्दी होत आहे.

पथकातील कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण

शहरातील विविध ठिकाणी नागरिकांना गर्दीपासून परावृत्त करणाऱ्या या दक्षता पथकातीलच काही कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली. जीवाशी खेळून ही पथके नागरिकांना गर्दीपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करत असून, काही विक्रेते त्यांना अरेरावी करत आहेत.