पेन्शनर्सला हयात असल्याच्या दाखल्यासाठी मरण यातना

राजेंद्र सावंत
Thursday, 26 November 2020

सेवा निवृत्तीधारकांना निवृत्तीवेतन मिळण्यासाठी पंचायत समिती व संबंधित विभागाच्या आस्थापनाकडे हयात असल्याचा दाखला द्यावा लागतो.

पाथर्डी : सेवा निवृत्तीधारकांना जिवंत असल्याचा दाखल मिळविण्यासाठी सरकारी कार्यालयात चकरा माराव्या लागत आहेत. तालुक्‍यातील 78 ग्रामपंचायतींवर प्रशासक असल्याने सेवा निवृत्तीधारक दाखल्यासाठी प्रशासकाडे जातात. पण, एकाही प्रशासक जागे मिळत नाही. कोणताही प्रशासकीय अधिकारी दाखल्यावर सही करीत नाही. साहेब मी जिवंत आहे, त्याचा मला दाखल द्या अशी भीक सेवानिवृत्त लोकांना घालावी लागत आहे. 

सेवा निवृत्तीधारकांना निवृत्तीवेतन मिळण्यासाठी पंचायत समिती व संबंधित विभागाच्या आस्थापनाकडे हयात असल्याचा दाखला द्यावा लागतो. तालुक्‍यातील 78 ग्रामपंचायतीवर प्रशासक आहेत. एका प्रशासकाकडे पाच ते सहा ग्रामपंचायतीचा कारभार आहे. हयातीचा दाखला मिळविण्यासाठी निवृत्तीधारक ज्येष्ठ नागरिक व महिला ग्रामपंचायतीचे उंबरे झिजवत आहेत.

सरपंच, गटविकास अधिकारी, पोलिस निरीक्षक, तहसीलदार, पोस्टमास्तर, पोलिस पाटील या पैकी कोणाचीही सही दाखल्यावर चालते. तालुक्‍यातील 75 टक्के गावाला पोलिस पाटीलच नाहीत, अनेक जागा रिक्त आहेत. 78 ग्रामपंचायतीवर सरपंचाऐवजी प्रशासक आहेत.

एका प्रशासकाकडे चार चे पाच ग्रामपंचायती आहेत. हयातीच्या दाखल्यावर सही करण्यासाठी पोस्टमास्तर, गटविकास अधिकारी व नायब तहसीलदार नकार देतात. पोलिस निरीक्षकाकडे जाऊन कशाला उगाच डोक्‍याला ताप म्हणून ज्येष्ठ नागरिक तहसीलदार यांच्या कार्यालयात येतात. तहसीलदार व दोन नायब तहसीलदार कार्यालयात नव्हते. एक नायबतहसिलदार म्हणाले आम्हाला अधिकारच नाहीत. 

प्रांताधिकाऱ्याच्या आदेशाला केराची टोपली 
मोहोजदेवढे येथील दोन निवृत्तीधारक हयातीच्या दाखल्यासाठी प्रशासकाकडे पंचायत समितीमध्ये गेले प्रशासक रजेवर होते. गटविकास अधिकाऱ्यांना दूरध्वनीवरून विचारले ते म्हणाले, आम्हाला अधिकार नाहीत. त्यांना एकाही अधिकारी जागेवर सापडला नाही.

अखेर तहसील कार्यालय गाठले. प्रांतअधिकारी देवदत्त केकाण तहसील कार्यालयात कामासाठी आले होते. नायब तहसीलदारांनी केकाण यांच्यासमोर मी जबबादारी घेत नाही, असे सांगितले. केकाण यांनी मात्र सह्या करून देण्याचे आदेश दिले. अखेर एका अव्वल कारकून महिलेने वरिष्ठांच्या आदेशाने हयातीच्या दाखल्यावर सह्या करुन दिल्या.

निवृत्त कर्मचाऱ्यांना हयातीचे दाखले देण्याचे ज्यांना सरकारने अधिकार दिले आहेत. त्यांनी दाखले दिले पाहिजेत. आयुष्यभर ज्यांनी प्रशासकीय सेवा केली त्यांना माणुसकीच्या भावनेतून वागविले पाहिजे. जे अधिकारी सह्या करायला नकार देतील. त्यांच्याबाबत लेखी तक्रार आल्यास चौकशी करुन दोषीविरुद्ध कारवाई करू.

- देवदत्त केकाण, प्रांतअधिकारी, पाथर्डी-शेवगाव 

आम्ही आयुष्यभर शासकीय कर्मचारी म्हणून सेवा केली. आता निवृत्ती वेतनासाठी लागणाऱ्या हयातीच्या दाखल्यासाठी अधिकाऱ्यांच्या दारात ताटकळत उभे राहवे लागते. ज्येष्ठ नागरिक म्हणून तरी चांगली वागणूक द्यावी व अडवणूक थांबवावी. 
- पांडुरंग आंधळे, निवृत्त केंद्र प्रमुख 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The pensioners did not get any proof of survival