
पठारवाडी येथील घोडोबा देवस्थान मंदिरासमोरील अतिशय पुरातन अशा कडूलिंबाचे झाड तोडले आहे.
पारनेर (नगर) : पठारवाडी येथील घोडोबा देवस्थान मंदिरासमोरील अतिशय पुरातन अशा कडूलिंबाचे झाड तोडले आहे. या प्रकरणी पारनेरच्या वृक्ष अधिकारी तथा वन अधिकारी एस.व्ही गोरे यांनी झाड तोडणारा संतोष बबन काळे (रा.पठारवाडी) यांना एक हजार रुपये दंडासह येत्या पावसाळ्यात झाडे लावण्याची शिक्षा सुनावली आहे.
या बाबत अधिक माहिती अशी की, पठारवाडी येथील घोडाबा मंदिरासमोर एक मोठे कडूलिंबाचे झाड होते. ते झाड येथील काही लोकांनी कापले होते. या बाबतची तक्रार लोकजागृती सामाजिक संस्थेचे रामदास घावटे यांनी वनअधिकारी व तहसिलदार पारनेर यांच्याकडे केली होती. तहसिलदाराच्या आदेशानंतर वनअधिकारी यांनी पंचनामा करून काळे यांच्याविरूद्ध बेकायदेशीर वृक्षतोडीचा गुन्हा दाखल केला होता.
पंचनामा केला त्यावेळी काळे यांनी झाड तोडल्याचा गुन्हा कबुल केला होता. वडझिरे वनपाल यांच्या अहवालानंतर वनअधिकारी गोरे यांनी वृक्ष तोडणाऱ्याला राज्याच्या झाडे तोडण्याबाबतच्या अधिनियमानुसार दोषी धरून एक हजार रूपये दंडासह येणाऱ्या पावसाळ्यात वृक्ष लागवड करण्याचे शपथपत्र करण्याचे आदेश दिले आहेत. या बाबत घावटे यांनी सतत पाठपुरावा केला होता.
लोकजागृती सामाजिक संस्थेचे रामदास घावटे म्हणाले, वनाधिकाऱ्यांच्या निर्णयाचे स्वागत आहे. परंतु बेकायदेशीर वृक्षतोडीचे प्रकार तालुक्यात सर्रास सुरु आहेत. मात्र वन अधिकारी तक्रार केल्यावरच कारवाई करतात. वन विभागाने स्वतःहून कोणत्याच कारवाया केलेल्या दिसत नाही.
संपादन - सुस्मिता वडतिले