मानोरी नदीवरील पुलाचा खांब निखळला

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 5 December 2020

हा पूल कोसळण्याची भीती निर्माण झाली आहे. यामुळे पुलावरील वाहतूक आठ दिवसांपासून बंद आहे. पुलाची दुरुस्ती करावी किंवा नवीन पूल बांधावा, अशी मागणी होत आहे. 

राहुरी : तालुक्‍यातील मानोरीतील मुळा नदीवरील बंधाऱ्यानजीक असलेल्या नाल्यावरील पूल धोकादायक झाला आहे. पुलाचा खांब पडल्यामुळे त्याला चिरा पडल्या आहेत.

हा पूल कोसळण्याची भीती निर्माण झाली आहे. यामुळे पुलावरील वाहतूक आठ दिवसांपासून बंद आहे. पुलाची दुरुस्ती करावी किंवा नवीन पूल बांधावा, अशी मागणी होत आहे. 

लोणीतील लघू पाटबंधारे उपविभागाने 2009 मध्ये या पुलाचे बांधकाम केले. त्या वेळी साडेअकरा लाख रुपये खर्च झाले. मुळा पाटबंधारे विभागाकडे पूल हस्तांतरित केला. मानोरीच्या दुतर्फा असलेल्या ग्रामस्थांना या पुलामुळे जवळचा मार्ग मिळाला.

रोज चारशे दुचाकी, शेतमजुरांच्या रिक्षा, दुधाचे व जनावरांच्या चारावाहतुकीचे छोटे टेम्पो, तसेच कारवाहतुकीची शेतकऱ्यांची सोय झाली. मानोरी बंधाऱ्यावरून ब्राह्मणी, वांबोरीपर्यंत दळणवळणाची व्यवस्था झाली. 

पुलाला चिरा पडण्यास सुरवात झाली. मागील तीन वर्षांत पुलाच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष झाले. या वर्षी पावसाळ्यात पुराच्या पाण्यामुळे पुलाचा खांब कोसळला. त्यामुळे पुलावरील चिरा वाढल्या.

मुळा पाटबंधारे विभागाने मानोरी व केंदळ खुर्द ग्रामपंचायतीला पत्र देऊन, पुलावरील वाहतूक बंद करण्याच्या सूचना दिल्या. या पुलाची दुरुस्ती करावी, अशी मागणी पंचायत समिती सदस्य रवींद्र आढाव, सरपंच अब्बास शेख, उत्तम आढाव, शिवाजी थोरात, बाबासाहेब आढाव यांनी केली आहे. 

अहमदनगर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The pillar of the bridge over the Manori River came off