esakal | मुख्यमंत्रीसाहेब तुम्हीच सांगा कसं जायचं आम्ही या रस्त्याने 
sakal

बोलून बातमी शोधा

Pits on the road at Wanjulpoi in Rahuri taluka

वांजुळपोई येथे म्हसोबा फाटा ते अंमळनेर बंधाऱ्यापर्यंतच्या तीन किलोमीटर रस्त्याची दुर्दशा झाली आहे.

मुख्यमंत्रीसाहेब तुम्हीच सांगा कसं जायचं आम्ही या रस्त्याने 

sakal_logo
By
विलास कुलकर्णी

राहुरी (अहमदनगर) : वांजुळपोई येथे म्हसोबा फाटा ते अंमळनेर बंधाऱ्यापर्यंतच्या तीन किलोमीटर रस्त्याची दुर्दशा झाली आहे. संततधार पावसामुळे संपूर्ण रस्ता चिखलमय झाला. चारचाकी, दुचाकी वाहने चिखलात फसत असल्याने वाहतूक बंद पडली आहे. या रस्त्याच्या दुतर्फा वस्त्यांवरील ग्रामस्थांना गुडघाभर चिखल तुडवीत वाट काढावी लागत आहे. लोकप्रतिनिधींनी रस्त्याच्या कामासाठी निधी देऊन, रस्ता वाहतुकीसाठी सुसह्य करावा. अशी ग्रामस्थांची मागणी आहे.

राहुरी विधानसभा मतदारसंघाचे १६ वर्षापूर्वी विभाजन झाले. तालुक्यातील ३२ गावे श्रीरामपूर विधानसभा मतदार संघात जोडली गेली. त्यात वांजुळपोई गावाचा समावेश आहे. या ३२ गावांमध्ये लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष झाल्याचा आरोप नागरिक वारंवार करतात. 

रस्त्यांच्या कामाकडे लक्ष झाल्याने, रस्त्यांची पुरती वाट लागली आहे. वांजुळपोई येथे म्हसोबा फाटा ते अंमळनेर बंधारा रस्ता जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारीत आहे. 

चिखलाने माखलेल्या या रस्त्याच्या दुतर्फा वस्त्यांवरील नागरिकांचे वाट काढतांना प्रचंड हाल होत आहेत. दूध उत्पादक शेतकऱ्यांना घरातच दूध ठेवावे लागत आहे. शेतमालाची वाहतूक होत नसल्याने, भाजीपाला शेतातच सडत आहे. कोरोनामुळे शाळा बंद आहेत. अन्यथा विद्यार्थ्यांचे केवळ रस्त्यामुळे बंद झाले असते. कोरोनामुळे शासनाकडे तात्काळ निधी उपलब्ध नाही. परंतु, ग्रामस्थांचे हाल विचारात घेऊन, या रस्त्याचे काम लवकरात लवकर हाती घ्यावे. वाहतुकीसाठी बंद पडलेला रस्ता ग्रामस्थांना खुला करावा. अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

राहुरी तालुक्याची गावे श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाला जोडल्याने, रस्त्यांना निधी मिळत नाही. वांजुळपोई येथे म्हसोबा फाटा ते अमळनेर बंधारा रस्ता चिखलामुळे बंद झाला आहे. प्रत्येक लोकप्रतिनिधीला वेळोवेळी व्यथा मांडली. परंतु, कुणालाही गांभीर्य नाही. बंधू किशोर गाडे यांचा बारा टन कांदा विक्रीसाठी नेऊ शकत नाही. त्यामुळे चाळीत कांदा सडत आहे, असे शांताराम गाडे यांनी सांगितले.

तिळापूर येथील मुळा व प्रवरा नदीवरील संगमावर असलेल्या महादेव मंदिराचा 'क' वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा आहे. माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी तीर्थक्षेत्र विकास योजनेच्या निधीतून मंदिर परिसरातील रस्त्यांची कामे करण्यासाठी पाठपुरावा सुरू केला आहे. त्यात, वांजुळपोई येथील रस्त्याचा समावेश आहे. निधी उपलब्ध होताच या रस्त्याचे काम हाती घेतले जाईल.
- राजेश इवळे, उप अभियंता, जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम उपविभाग, राहुरी 

संपादन : अशोक मुरुमकर

loading image
go to top