संततधारेमुळे रस्त्याची चाळण; ‘या’ मार्गावरुन जायचे कसे

सचिन सातपुते
Tuesday, 18 August 2020

आठवडयाभरापारून सुरु असलेल्या संततधारेमुळे शहरातील प्रमुख रस्त्यांवर मोठमोठाले खड्डे पडून त्यांची अक्षरश: चाळण झाली आहे.

शेवगाव (अहमदनगर) : आठवडयाभरापारून सुरु असलेल्या संततधारेमुळे शहरातील प्रमुख रस्त्यांवर मोठमोठाले खड्डे पडून त्यांची अक्षरश: चाळण झाली आहे. खडयातून मार्ग काढतांना वाहन चालकांची चांगलीच धमछाक होत आहे. तसेच पादचाऱ्यांनाही चालणे मुश्कील झाले असून या रस्त्यांची त्वरीत दुरूस्ती करण्याची मागणी नागरीकांतून होत आहे.

नगर, नेवासे, पाथर्डी, पैठण व गेवराईकडे जाणारे प्रमुख राज्यमार्ग शेवगाव शहरातून जातात. मराठवाडयातून या मार्गाने पुणे, मुंबईकडे जाणाऱ्या मोठया वाहनांची संख्या ही जास्त आहे. तालुक्यात यावर्षी सुरुवातीपासून दमदार पावसामुळे सर्वच मार्गावर छोटे मोठे खड्डे पडले होते. मात्र आठवडयापासून सुरु असलेल्या संततधारेमुळे या सर्व राज्यमार्गांची वाट लागली आहे.

पैठण रोडवरील महात्मा गांधी पुतळ्याशेजारील व डॉ. दारकुंडे हॉस्पिटल समोरील रस्त्यांवर मोठमोठाले खड्डे पडून या रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली आहे. अशीच परिस्थिती नेवासे रस्त्यावरील पवार बजाज शोरुम, अजिंक्य हाँटेल समोर, बसस्थानकासमोरील क्रांती चौक, आंबेडकर चौक, पाथर्डी रस्त्यावरील आबासाहेब काकडे शिक्षणशास्त्र महाविदयालया समोर तसेच मिरी मार्गे रस्त्यावर अनेक ठिकाणी रस्त्यांची दुरवस्था झाली आहे.

पैठण रोड, पाथर्डी रस्त्यावरील खड्डे तर खुप मोठमोठाले असून त्यातून गाडी घातल्यास ती तेथेच अडकून पडते. दुचाकी वाहनचालकांचे याठिकाणी अपघात नित्याचेच झाले आहेत. मागील काही महिन्यापूर्वीच या रस्त्याची डागडूजी करुन बीले काढण्यात आली आहेत. मात्र डागडूजी केलेल्याच ठिकाणी पुन्हा खड्डे पडल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने केलेल्या कामाबाबत शंका उपस्थित केली जाते.

या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी प्रवाशी व नागरीक करत असतांना सार्वजनिक बांधकाम विभाग जाणीव पूर्वक दुर्लक्ष करीत आहे. या रस्त्यावर अपघातांची मालिका सुरुच असून एखादया प्रवाशाचा जीव गेल्यावर रस्त्याची दुरुस्ती करणार का असा प्रश्न ग्रामस्थ उपस्थित करीत आहेत.

 

मतदारसंघाच्या लोकप्रतिनिधी शेवगावकडे फिरकतच नसल्याने शहरातून जाणाऱ्या रस्त्यांची व शहरातील अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था त्यांना माहिती नाही. त्यांचे या रस्त्यांच्या दुरवस्थेकडे जाणीव पुर्वक दुर्लक्ष असल्याने संबंधीत विभागाचे अधिकारी निर्ढावले आहेत. त्यांच्यावर कुणाचा अंकुश राहीलेला नाही. येथून पुढे आपल्या प्रश्नांसाठी नागरीकांनीच पेटून उठले पाहीजे.

- दत्ता फुंदे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना 

 

सार्वजनिक बांधकाम विभागाने पावसाळ्यापूर्वी पडलेल्या खड्ड्यांच्या कामासाठी मोठी बीले काढली. मात्र त्याच ठिकाणी खड्डे पडल्याने त्यांच्या कामाबाबत शंका उपस्थित होत असून याची चौकशी व्हावी.
- आशुतोष डहाळे, ग्रामस्थ, शेवगाव 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pits on roads in Shevgaon taluka due to rain