भंडारदरा धरणातून पाणी सोडण्याचे नियोजन सुरू; कार्यकारी अभियंता जलशयावर ठान मांडून

शांताराम काळे
Saturday, 15 August 2020

भंडारदरा, मुळा पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरु आहे.

अकोले (अहमदनगर) : भंडारदरा, मुळा पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरु आहे. भंडारदरा पाणलोट क्षेत्रात घाटघर येथे सुमारे १२ इंच (२९० मिलीमीटर), रतनवाडी ११ इंच (२७० मिलीमीटर), पांजरे १०. ५ इंच (२६६ मिलीमीटी) व भंडारदरा ५. ५ इंच (२६३ मिलीमीटर) पाऊस झाल्याने जलाशयात ११७२. ७२ दशलक्ष घनफूट पाण्याची आवक झाल्याने जलाशयात १०००१ दशलक्ष घनफूट पाणीसाठा होऊन ९२ टक्के धारण भरले आहे. रविवारी दुपारपर्यंत जलाशय तांत्रिक दृष्ट्या भरणार असल्याने सांडव्यामधून पाणी सोडण्यात येणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

पाणलोटात जोरदार पर्जन्यवृष्टी होत असून जलाशय भरण्याची प्रक्रिया अधिक आहे. भंडारदरा जलाशय पाणी पातळी ७४२. ७२० मीटर असून जलाशयामध्ये ९६०६ दशलक्ष घनफूट (. ६०टीएमसी) इतका पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे १५ ऑगस्टला रात्री किंवा १६ ऑगस्टला दुपारी निर्धारित पाणी पातळी राखण्यासाठी जलाशयातून पाणी सोडावे लागणार आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांनी व वाडी, वस्तीतील नागरिकांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने सतर्क राहावे, असे आव्हान अहमदनगर पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता ग. भा. नानॉर यांनी केले आहे.

निर्धारित पाणी पातळी राखण्यासाठी १३ ऑगस्ट दुपारी ४ वाजलेपासून धारण पायथ्या विधुत ग्रह क्रमांक १ मधून ८३५ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग प्रवरा नदीमध्ये सोडण्यात आला आहे. तसेच पाणलोट क्षेत्रात पर्जन्यमान असेच सुरु राहिले तर जलाशय परिचालन सूचनेनुसार निर्धारित पाणी पातळी राखण्यासाठी आवश्यकतेनुसार यथावकाश सांडव्याद्वारे पाणी सोडण्यात येणार असल्याने नागरिकांनी सुरक्षेच्या करणास्तव नदीपात्रात जाऊ नये. विद्युत मोटारी, इंजिने, शेती अवजारे अथवा साहित्य यांचे योग्य काळजी घ्यावी, असे आवाहन जलसंपदा विभागाने केले आहे.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Planning to release water from Bhandardara dam in Akole taluka started