रोहित पवारांच्या मातुःश्रींनी केलेली प्रतिज्ञा होतेय व्हायरल

वसंत सानप
Wednesday, 27 January 2021

कोणताही उपक्रम राबविताना सामाजिक कार्यकर्त्या सुनंदाताई ह्या 'मिशन' म्हणून हाती घेतात. उपक्रमादरम्यान 'शिस्त' सक्तीची ठरलेली. निटनेटकेपणा, वक्तशीरपणा आणि प्रामाणिकपणा ही 'त्रिसूत्री' घेऊन त्यांचे काम सुरू आहे.

जामखेड :  कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघाच्या सत्तेत परिवर्तन झाले; पस्तीस वर्षांपासून येथील मतदारांची निर्माण झालेली मानसिकता बदलली आणि भाजपाच्या विचाराचा हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळाला.

गेल्या वर्षभरापासून येथील नागरिकांची मानसिकता बदलून येथे बदल घडवून आणण्यासाठी आमदार रोहित पवार यांचे प्रयत्न सुरु आहेत. या करिता त्यांना त्यांचे अख्खे कुटुंब मदतीसाठी मतदारसंघात धावून आले आहे. यामध्ये वडील राजेंद्र पवार, आई सुनंदाताई पवार आणि पत्नी कुंतीताई पवार यांचा समावेश आहे.

राजेंद्र पवारांनी येथील शेती आणि शेतकरी शाश्वत बदलासाठी काम सुरु ठेवले आहे. मातोश्री सुनंदाताई यांनी महिला बचत गट, स्वच्छता, सामाजिक प्रबोधन या व इतर विविध उपक्रमांमध्ये आघाडी घेतली आहे. त्यांच्या स्नुषा कुंतीताईंचीदेखील त्यांना मदत मिळते.

हेही वाचा - आरक्षणाने केली राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची गोची, भाजप नेत्याला फायदा

कोणताही उपक्रम राबविताना सामाजिक कार्यकर्त्या सुनंदाताई ह्या 'मिशन' म्हणून हाती घेतात. उपक्रमादरम्यान 'शिस्त' सक्तीची ठरलेली. निटनेटकेपणा, वक्तशीरपणा आणि प्रामाणिकपणा ही 'त्रिसूत्री' घेऊन त्यांचे काम सुरू आहे. प्रसंगी त्या कठोर होतात पण तेवढ्याच प्रेमळ आहेत.

जामखेड शहर स्वच्छ सर्व्हेक्षणांतर्गत खूपच पिछाडीवर आहे, याची खंत त्या व्यक्त करीत आहेत. समाजातील विविध घटकांनी,संघटनांनी या उपक्रमात सहभाग नोंदवून आपलं शहर स्वच्छ व सुंदर व्हावं याकरिता काम करावं, अशी त्यांची तळमळ असते. हे समाज मनावर बिंबविण्यासाठी त्यांनी जो पर्यंत स्वच्छता सर्वेक्षणात जामखेडचा क्रमांक अग्रभागी येत नाही; तोपर्यंत जामखेडमध्ये होणाऱ्या जाहीर कार्यक्रमात जामखेडकरांकडून सन्मान अथवा सत्कार स्वीकारणार नाही; अशी प्रतिज्ञा केली आहे. या प्रतिज्ञेमागे जामखेडकरांनी समजून घेऊन स्वच्छता सर्वेक्षणात सहभागी होऊन खारीचा वाटा उचलावा, असा हेतू आहे! ही प्रतिज्ञा सोशल मीडियावरही व्हायरला होते आहे.

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The pledge made by Rohit Pawar's mother in Jamkhed is going viral