
Ahmednagar News: १५ लाखांचा गांजा, अफूची झाडे जप्त
Ahmednagar News : नेवासे तालुक्यातील शहापूर व देवगाव शिवारात शेतकऱ्यांनी चक्क अफू आणि गांजाची शेती केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
पोलिसांनी या शेतात छापे टाकून १४ लाख ९५ हजार ४२० रुपये किमतीची अफू व गांजाची झाडे जप्त केली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली.
नेवासे तालुक्यातील शहापूर शिवारात बाबूराव साळवे व देवगाव शिवारात रावसाहेब गिलबिले यांनी त्यांच्या शेतात बेकायदेशीररीत्या गांजा व अफूच्या झाडांची लागवड केली, अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक अनिल कटके यांना मिळाली.
त्यानुसार त्यांच्या पथकातील सहायक निरीक्षक गणेश वारुळे, सहायक फौजदार विष्णू घोडेचोर, मनोहर गोसावी, दत्तात्रय गव्हाणे, संदीप घोडके, देवेंद्र शेलार, शंकर चौधरी, संदीप दरंदले, शिवाजी ढाकणे, भाग्यश्री भिटे, ज्योती शिंदे व बबन बेरड यांनी स्थानिक पोलिस, पंच व इतर साधने सोबत घेऊन प्रथम शहापूर येथील साळवे यांच्या शेतात पाहणी केली.
त्या ठिकाणी गव्हाच्या शेतात अडीच फूट उंचीची दोन व घरासमोर ८ फूट उंचीचे एक गांजाचे झाड, तसेच घरासमोर पोत्यावर गांजाच्या झाडाचा पाला काढून तो वाळविण्यास ठेवल्याचे आढळून आले.
पोलिसांनी या ठिकाणाहून एक लाख ११ हजार ४४० रुपये किमतीचा गांजा जप्त केला. त्यानंतर देवगाव येथे रावसाहेब भागूजी गिलबिले यांच्या शेताची पाहणी केली.
तेथे शेतात अफूच्या झाडांची लागवड केल्याचे आढळून आले. तेथून १३ लाख ८४ हजार रुपयांची ६२१ अफूची झाडे जप्त करण्यात आली. याप्रकरणी पोलिस नाईक संदीप संजय दरंदले यांच्या फिर्यादीवरून आरोपींविरुद्ध नेवासे पोलिसांनी गुन्हा नोंदविला.
यातील दोन्ही आरोपी फरार आहेत. नेवासे पोलिस स्टेशनचे निरीक्षक शिवाजी डोईफोडे तपास करत आहेत.