राहुरी तालुक्यात एकाच दिवशी पाच ठिकाणी छापे टाकून दारुअड्डे उध्वस्त

विलास कुलकर्णी
Sunday, 8 November 2020

राहुरी पोलिसांनी वांबोरी परिसरात अवैध धंद्यांवर एकाच दिवशी छापे टाकून पाच दारुअड्डे व दोन जुगार अड्डे उध्वस्त केले.

राहुरी (अहमदनगर) : राहुरी पोलिसांनी वांबोरी परिसरात अवैध धंद्यांवर एकाच दिवशी छापे टाकून पाच दारुअड्डे व दोन जुगार अड्डे उध्वस्त केले. याप्रकरणी सात जणांविरुद्ध राहुरी पोलिस ठाण्यात गुन्हे नोंदविण्यात आले. पोलिसांनी दिवाळीच्या तोंडावर अवैध धंद्यांविरुद्ध कारवाईची मोहीम राबविल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

सुभाष बबन धोत्रे (वय 28, रा. वांबोरी), किशोर एकनाथ डुक्रे (रा. वांबोरी), दीपक बाबासाहेब गोठुळे (रा. वांबोरी), भाऊराव सोपान मोरे (वय 35, रा. वांगी, ता. श्रीरामपूर), प्रशांत बापूराव सरोदे (रा. वांबोरी), अनिल पांडुरंग कुसमुडे (वय 41, रा. वांबोरी) व वसंत शाम ससाने (वय 42, वांबोरी) अशी जुगार अड्डे चालक संशयित आरोपींची नावे आहेत. 
वांबोरी परिसरात कोरोना लॉकडाऊन काळात अवैध धंदे फोफावले होते. त्यामुळे नागरिक वैतागले होते. पोलिस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवारी (ता. 6) रात्री राहुरी पोलिसांनी अवैध धंद्यांविरुद्ध कारवाईची मोहीम राबविली.

दारू अड्ड्यावर हातभट्टी दारूची रसायने, देशी व विदेशी दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या. बेकायदा कल्याण मटका नावाच्या जुगार अड्ड्यांवर जुगाराचे साहित्य व रोख रक्कम ताब्यात घेण्यात आली. पोलिसांचा ताफा पाहून ग्राहकांनी धूम ठोकली. दारू व जुगार अड्डे चालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले. 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police action at five places in Rahuri taluka