शेतात महिलेवर अत्याचार करुन पुण्याला पळुन गेलेल्या संशयिताला पोलिसांकडून अटक

आनंद गायकवाड
Saturday, 14 November 2020

तालुक्‍यातील एका गावातील 35 वर्षीय महिलेवर तिच्या नात्यातील एकाने शेतात एकटे गाठून अत्याचार केला.

संगमनेर (अहमदनगर) : तालुक्‍यातील एका गावातील 35 वर्षीय महिलेवर तिच्या नात्यातील एकाने शेतात एकटे गाठून अत्याचार केला. ही घटना मंगळवारी (ता. 10) दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली. याप्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरून आश्वी पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत आरोपीला पुण्यातून अटक केली. 

अण्णा लहानू घुगे (वय 50, रा. पुणे) असे त्याचे नाव आहे. संशयित आरोपी शेताच्या कामासाठी अधूनमधून गावाकडे येत असतो. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला जनावरांना गवत आणण्यासाठी शेतात गेली होती. त्या ठिकाणी आलेल्या आरोपीने पीडितेला शेतात एकटे गाठून, आरडाओरड केल्यास जिवे मारण्याची धमकी दिली व तिच्यावर अत्याचार करून पुण्याला पळून गेला.

या कृत्याला विरोध करताना तिचे दोन्ही हात, डावी मांडी व कमरेला दुखापत झाली आहे. तिने हा प्रकार तिचे पती व इतरांना सांगितल्यानंतर बुधवार (ता. 11) आश्वी पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस निरीक्षक सुधाकर मांडवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पुणे येथून आरोपीच्या मुसक्‍या आवळल्या.

संपादन : अशोक मुरुमकर 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police arrested a suspect who fled to Pune after torturing a woman in a field