डिझेल प्रकरणातील मुख्य सूत्रधार झाला गजाआड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Police have arrested the mastermind of the diesel case

पोलिस अधीक्षक पाटील यांनी गुन्ह्याचा तपास श्रीरामपूरचे पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्याकडे सोपविला. मिटके यांनी तपास हाती घेतल्यानंतर त्याला अटक केली.

डिझेल प्रकरणातील मुख्य सूत्रधार झाला गजाआड

sakal_logo
By
सूर्यकांत वरकड

नगर : बनावट डिझेल प्रकरणात पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या पथकाने काल (ता. 11) रात्री लोणी (ता. राहाता) परिसरातून मुख्य सूत्रधारासह त्याच्या मुलाला ताब्यात घेतले. न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. शब्बीर नूरमहंमद देशमुख (वय 58, रा. राहुरी खुर्द) व त्याचा मुलगा मुदस्सर शब्बीर देशमुख (वय 23), अशी त्यांची नावे आहेत.

तत्कालीन अपर पोलिस अधीक्षक डॉ. दत्ताराम राठोड यांच्या पथकाने जीपीओ चौकात छापा घालून बनावट डिझेलचे दोन टॅंकर ताब्यात घेतले होते. त्यात एकाला अटक केली. या बाबत भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

भिंगार कॅम्प पोलिसांकडून तपासाला वेग मिळत नसल्याने, पोलिस अधीक्षकांनी शहराचे पोलिस उपअधीक्षक विशाल ढुमे यांच्याकडे हा तपास सोपविला. ढुमे यांच्या पथकाने डिझेल प्रकरणात आणखी एकाला अटक केली. मात्र, त्यानंतर गुन्ह्याच्या तपासात प्रगती न झाल्याने माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांना भेटून मुख्य आरोपीच्या अटकेची मागणी केली. 

दरम्यान, पोलिस अधीक्षक पाटील यांनी गुन्ह्याचा तपास श्रीरामपूरचे पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्याकडे सोपविला. मिटके यांनी तपास हाती घेतल्यानंतर, काल रात्री मुख्य सूत्रधार शब्बीर देशमुख व त्याच्या मुलाला अटक केली. न्यायालयाने दोन्ही आरोपींना दोन दिवस पोलिस कोठडी सुनावली. 

बड्यांचे धाबे दणाणले 
मुख्य सूत्रधार शब्बीर देशमुख याला अटक झाल्यानंतर बनावट डिझेल प्रकरणात अनेकांचे धाबे दणाणले आहे. नगर शहरातील बड्या लोकांची व त्यांच्या नातेवाइकांची नावे या प्रकरणात पुढे येऊ लागली असून, त्यांच्या घरांना डिझेलचा वास लागल्याची माहिती सूत्रांकडून समजली. 
 
"तो' अहवाल येणे बाकी 
पोलिसांनी बनावट डिझेलप्रकरणी छापा घालून संशयित चार आरोपींना अटक केली. दोन टॅंकर जप्त केले. मात्र, टॅंकरमधील डिझेलचे नमुने पुणे येथील न्यायवैद्यक प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. तेथील अहवाल आल्यानंतर खरा प्रकार समोर येईल. 

loading image
go to top