श्रीरामपूर, नेवाशाचे प्रभारी पोलिस निरीक्षक नियंत्रण कक्षात

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 27 October 2020

गुटखा प्रकरणात बहिरट यांनी मुख्य आरोपीला अभय दिल्याबाबत तक्रारी पोलिस अधीक्षकांकडे करण्यात आल्या होत्या. त्यामुळे बहिरट वादग्रस्त ठरले होते. आता त्यांची बदली पोलिस नियंत्रण कक्षात करण्यात आली आहे. 

नगर : श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्याचे प्रभारी पोलिस निरीक्षक श्रीहरी बहिरट व नेवासे पोलिस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक रणजीत डेरे यांची नियंत्रण कक्षात बदली झाली. त्यांच्या जागी प्रशिक्षणार्थी आयपीएस अधिकारी पदभार घेणार आहेत, असा आदेश पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी काढला. 

नेवासे पोलिस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक डेरे यांचा पदभार प्रशिक्षणार्थी आयपीएस अधिकारी अभिनव त्यागी यांच्याकडे सोपविला आहे. श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक बहिरट यांचा पदभार आयुष नापाणी यांच्याकडे दिला आहे.

26 ऑक्‍टोबर ते 20 जानेवारी 2021 या कालावधीपर्यंत हा कार्यभार आयपीएस अधिकाऱ्यांकडे राहणार आहे. त्यांना पोलिस ठाण्याची माहिती देऊन दोन्ही निरीक्षकांना तत्काळ नियंत्रण कक्षात हजर होण्याचे आदेशात म्हटले आहे. 

दरम्यान, श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक बहिरट यांचा कार्यकाळ वादग्रस्त ठरला. तेथील गुटखा प्रकरण चांगलेच गाजले. पोलिस अधीक्षकांनी गुटखा प्रकरणाचा तपास बहिरट यांच्याकडून काढून शिर्डीचे पोलिस उपअधीक्षकांकडे दिला.

गुटखा प्रकरणात बहिरट यांनी मुख्य आरोपीला अभय दिल्याबाबत तक्रारी पोलिस अधीक्षकांकडे करण्यात आल्या होत्या. त्यामुळे बहिरट वादग्रस्त ठरले होते. आता त्यांची बदली पोलिस नियंत्रण कक्षात करण्यात आली आहे. अहमदनगर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police Inspector in charge of Shrirampur, Nevasa in Control Room