esakal | दारू दुकान सुरू ठेवायचंय तर १५ हजार दरमहा द्यावे लागतील

बोलून बातमी शोधा

police logo

दारू दुकान सुरू ठेवायचंय तर १५ हजार दरमहा द्यावे लागतील

sakal_logo
By
अशोक निंबाळकर

नगर ः दारूच्या दुकानदारावर कारवाई न करणे व व्यवसाय सुरळीत ठेवण्यासाठी महिन्याला दहा हजार रुपयांचा हप्ता घेणारा तोफखाना पोलिस ठाण्याचा हवालदार बार्शीकर विलास काळे (वय 50) याला नगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जेरबंद केले.

दारू दुकानदारावर कारवाई न करणे व व्यवसाय सुरळीत चालू देण्यासाठी तोफखाना पोलिस ठाण्याचे हवालदार बार्शीकर काळे याने सोमवारी (ता. 26), प्रत्येक महिन्याला 15 हजार रुपये हप्ता देण्याची मागणी पंचांसमक्ष केली. तक्रारदारानी रक्कम कमी करण्याची मागणी केली. त्यावेळी तडजोडीअंती दहा हजार रुपये हप्ता देण्याचे ठरले.

हप्त्याची रक्कम मंगळवारी (ता. 27) नगर-मनमाड महामार्गावरील कॉटेज कॉर्नरजवळ घेण्याचे ठरले. नगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या परिसरात सापळा लावला. पंचांसमक्ष दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताच हवालदार काळे यास जेरबंद केले. पोलिस निरीक्षक सुनील कडासने व पोलिस उपअधीक्षक हरीश खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक श्‍याम पवरे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.