
स्थानिक गुन्हे शाखा व पाथर्डी पोलिसांनी एकनाथवाडी येथील तुरीच्या शेतात छापा घालून सात गोण्या गांजा जप्त केला.
पाथर्डी (अहमदनगर) : स्थानिक गुन्हे शाखा व पाथर्डी पोलिसांनी एकनाथवाडी येथील तुरीच्या शेतात छापा घालून सात गोण्या गांजा जप्त केला, तर दोन शेतकऱ्यांना ताब्यात घेतले. ही कारवाई बुधवारी सकाळी करण्यात आली.
पोलिस उपअधीक्षक सुदर्शन मुंडे, स्थानिक गुन्हे शाखेचे अनिल कटके, पोलिस निरीक्षक रमेश रत्नपारखी यांच्या पथकाने आज सकाळी एकनाथवाडी येथे छापा घातला. नगर व बीडच्या सीमेलगत डोंगराळ भागात तीन शेतकऱ्यांनी गांजाची शेती केल्याचे स्पष्ट झाले. तीन ते पाच फुटांपर्यंत वाढलेली गांजाची झाडे पोलिसांनी जप्त केली. सुमारे सात गोण्या गांजा पोलिसांनी जप्त केला.
एकनाथवाडी येथील दोन शेतकरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. एकनाथवाडी येथे तीन शेतकऱ्यांच्या शेतांतून पोलिसांनी गांजाची झाडे जप्त केली. स्थानिक गुन्हे शाखेची दोन पथके व पाथर्डीचे पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी बुधवारी ही कारवाई केली, असे पोलिस उपअधीक्षक सुदर्शन मुंडे यांनी सांगितले.
संपादन : अशोक मुरुमकर