गाव म्हणजे एक मोठे कुटुंब, निवडणुकीत शांततेचा भंग केल्यास कारवाई करण्याचा पोलिसांचा इशारा

गौरव साळुंके
Saturday, 26 December 2020

गाव म्हणजे एक मोठे कुटुंब असुन सर्वांनी सण- उत्सवासह निवडणूकीच्या काळात शांततेचा भंग होणार नाही.

श्रीरामपूर (अहमदनगर) : गाव म्हणजे एक मोठे कुटुंब असुन सर्वांनी सण- उत्सवासह निवडणूकीच्या काळात शांततेचा भंग होणार नाही. याची काळजी घ्यावी, अन्यथा कोणाचीही गय केली जाणार नसल्याचा इशारा प्रशिक्षणार्थी पोलिस अधिक्षक आयुष नोपाणी यांनी दिला आहे. 

श्रीरामपूर तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नोपाणी यांनी बेलापुर पोलिस चौकीसमोर विविध पक्षांच्या स्थानिक पदाधिकारी आणि ग्रामस्थांशी संवाद साधला. त्यावेळी ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. घटनेची चौकट आणि कायद्याच्या चाकोरीत राहून काम करण्याचा सर्वांना अधिकार आहे. परंतू ते सोडून कोणी व्यक्ती निवडणूक प्रक्रियेत बाधा आणुन समाजघातक कृत्य करीत असेल तर तातडीने पोलिसांना कळवा पोलिस संबधीतांवर तात्काळ कडक कारवाई करणार आहे.

बैठकीला जिल्हा परिषदेचे सदस्य शरद नवले, बाजार समिती संचालक सुधीर नवले, माजी सरपंच भरत साळुंके, देविदास देसाई, सुनील मुथा, रविंद्र खटोड, पोलीस पाटील अशोक प्रधान यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police warned to take action if peace is disturbed during elections