esakal | कोरोनानंतर दिवाळीतही पोलिस ऑन ड्युटी २४ तास! 
sakal

बोलून बातमी शोधा

Police's Diwali also on duty after Corona!

दिवाळीनिमित्त घरात फराळ बनविण्याचे मुख्य काम गृहिणी करतात. मात्र महिला पोलिसांना कामावरून रजा मिळत नसल्याने वेळात वेळ काढून घरी जाऊन फराळ बनवावे लागते.

कोरोनानंतर दिवाळीतही पोलिस ऑन ड्युटी २४ तास! 

sakal_logo
By
सुनील गर्जे

नेवासे : शासकीय, निम शासकीय कर्मचारी कुटुंबीयांसमवेत दिवाळीचा आनंद साजरा करीत असतानाच नागरिकांची दिवाळी आनंदात साजरी व्हावी, यासाठी पोलिसांना मात्र दिवाळी ऑन ड्युटीच साजरी करावी लागली.

कोरोना, गणपती उत्सव, नवरात्रोत्सव, दिवाळीसाठी इतर शासकीय कर्मचार्‍यांना सुट्या मिळत असल्याने सर्वांना आनंदोत्सव साजरा करता येतो. मात्र कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याबरोबरच रात्रीची गस्त घालून नागरिकांचे संरक्षण करणारे पोलीस दिवाळीत चोवीस तास ऑन ड्युटी पहायला मिळतात.

नेवासे तालुक्यात पोलीस दलातील नव्वद टक्क्यांहून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत. ते विनातक्रार जबाबदारी पार पाडत आहेत. 

समाजातील सर्व घटकांतून दिवाळी हा सण दरवर्षी मोठया उत्साहात साजरा केला जातो. कामासाठी शहरात गेलेले नागरिक दिवाळीसाठी गावाकडे येतात. दिवाळी आली की, आप्तजणांकडे जाण्याचा ओढा सर्वांना लागलेला असतो. घरात तयार केलेल्या गोडधोड पदार्थांपासून खमंग चिवड्याचा स्वाद घेत परिवारासमवेत दिवाळी साजरी केली जाते. या धामधुमीत पोलिसांना मात्र या सणाचा आनंद घेता येत नाही. 

दिवाळी सण असल्याने शहरासह ग्रामीण भागातील बाजारपेठ आदी ठिकाणी नागरिकांची गर्दी होणार हे ओळखून अशा ठिकाणी पोलीस बंदोबस्त असणे गरजेचे असते. गर्दीचा फायदा घेऊन घातपाती कारवाया किंवा चोरीसारखे गुन्हे घडण्याची शक्यता असल्याने पोलिसांना डोळ्यांत तेल घालून रांत्रदिवस बंदोबस्तासाठी थांबावे लागते.

दरम्यान नेवासे तालुक्याक्याला पोलिसांची संख्याबळ जितके आवश्यक आहे त्यापेक्षा कमीच संख्याबळ आहे. त्यामुळे आहे त्या कर्मचार्‍यांवरच कायदा व सुव्यवस्था राखण्याबरोबरच गुन्ह्यांचा तपास करणे, रात्र गस्त, चौकी सांभाळणे आदी कामे पोलिसांना करावी लागतात. 

महिला पोलिसांची अडचण 
दिवाळीनिमित्त घरात फराळ बनविण्याचे मुख्य काम गृहिणी करतात. मात्र महिला पोलिसांना कामावरून रजा मिळत नसल्याने वेळात वेळ काढून घरी जाऊन फराळ बनवावे लागते. शिवाय दिवाळीसाठी सून सासरी यावी, अशी सासरच्यांची इच्छा असते. मात्र कामावरुन सुटी मिळत नसल्याने प्रसंगी नाराजी ओढावून घ्यावी लागते. भाऊबिजेलाही हीच अडचण निर्माण होते. ही भावना समजून घेणे गरजेचे आहे. अशी प्रतिक्रिया नेवासे येथील महिला पोलीस सविता उंदरे-तोडमल यांनी व्यक्त केली. 
---------------------------------------
क्वोट- "सण, उत्साह, सोहळ्यांपेक्षा कर्तव्य महत्वाचे आहे. परिवारा समवेत दिवाळीसह इतर सण साजरे करावे अशी परिवारातील सदस्यांची इच्छा असते मात्र, त्यापेक्षाही कायदा सुव्यवस्था राखणे हे आम्हाला महत्वाचे वाटते. नागरिकांनाच्या आनंदातच आमचे समाधान आहे. 
- सुहास गायकवाड, पोलीस हेडकॉन्स्टेबल, 
- आंबादास गिते, पोलीस कॉन्स्टेबल, नेवासे
------------