गावकीच्या राजकारणामुळे भावकीला आले महत्त्व

मार्तंड बुचुडे
Saturday, 5 December 2020

गावपातळीवर सरपंचपदाला महत्त्व असते. मात्र, अद्याप त्याचे आरक्षण निघाले नसल्याने, अनेकांचे लक्ष सरपंचपदाच्या आरक्षणाकडे लागले आहे.

पारनेर : राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायत निवडणुकांची तयारी सुरू केली आहे. त्यानुसार प्रभागनिश्‍चिती व प्रभाग आरक्षण सोडत यापूर्वीच काढण्यात आल्या आहेत. मतदारयादीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे.

गावपातळीवर सरपंचपदाला महत्त्व असते. मात्र, अद्याप त्याचे आरक्षण निघाले नसल्याने, अनेकांचे लक्ष सरपंचपदाच्या आरक्षणाकडे लागले आहे. कारण, "सरपंच हैं तो सब कुछ हैं,' अशी चर्चा ग्रामीण भागात सुरू आहे. 

पारनेर तालुक्‍यात 114 ग्रामपंचायतींपैकी सर्वाधिक 88 ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे तालुक्‍यातील राजकीय वातावरण पूर्ण ढवळून निघणार आहे. त्या निमित्ताने तालुक्‍यातील सर्वपक्षीय कार्यकर्ते कामाला लागले आहेत. मात्र, कोरोनामुळे निवडणुका कधी होतील, हे सांगता येत नाही.

मतदारयाद्यांची प्रसिद्धी व जाहीर करण्याच्या अंतिम तारखा जाहीर झाल्या असल्या, तरी निवडणुकीचा कार्यक्रम अद्यापही जाहीर करण्यात आलेला नाही. 

गावनिहाय प्रभागानुसार फक्त उमेदवारांची आरक्षण सोडत काढण्यात आली आहे. मात्र, अद्याप सरपंचपदाची आरक्षण सोडत काढण्यात आलेली नाही. ग्रामीण भागात खऱ्या अर्थाने सरपंचपदालाच मोठा मान असतो.

गावाचा कारभार व राजकारणही त्या पदाभोवतीच फिरत असते. मात्र, सरपंचपदाचे आरक्षण निघाले नसल्याने अनेकांनी देव पाण्यात ठेवले आहेत, तर अनेक जण आरक्षण सोडतीकडे डोळे लावून बसले आहेत. 

निवडणुकांच्या निमित्ताने व उमेदवारी करायची, या भावनेतून अनेकांनी कोरोना संकटातच किराणा, मास्क, सॅनिटायझर आदींचे आपापल्या प्रभागात वाटप करून "समाजसेवा' केली आहे. त्यामुळे निवडणुका कधी होतात, याकडे आता राजकीय नेतेमंडळींसह इच्छुकांचे लक्ष लागले आहे. 
संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The political atmosphere in the rural areas heated up