राजकीय स्पर्धेतून वाढतायेत कोविड हेल्थ सेंटर

मार्तंड बुचडे
Monday, 10 August 2020

राजकिय स्पर्धेतून तालुक्यात दिवसेंदिवस कोविड हेल्थ सेंटरची संख्या वाढत आहे.

पारनेर (अहमदनगर) : राजकिय स्पर्धेतून तालुक्यात दिवसेंदिवस कोविड हेल्थ सेंटरची संख्या वाढत आहे. तालुक्यातील कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांचा संख्याही दिवसेंदिवस वाढत असतानाच राजकिय स्पर्धेतून का होईना कोविड हेल्थ सेंटर वाढल्याने तालुक्यातील गोरगरीब व सामान्य कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची सोय होत आहे, ही समाधानाची बाब आहे. सध्या सुरू असलेल्या या सर्व सेंटरमध्ये कोरोना रूग्णांवर सर्व प्रकारचे उपचार मोफत कोलो जात आहेत.

तालुक्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रभाव वाढत आहे. त्याचा परिणाम कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तालुक्यात सुमारे तीऩशेच्या वर कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या पोहचली आहे. अनेकांवर खाजगी रूग्णालयातही उपचार सुरू आहेत. पारनेरच्या आरोग्य विभाग व महसुल य़ंत्रणेने सर्वात प्रथम येथील समाजकल्याण विभागाच्या मुलींच्या वसतीगृहात कोरोना रूग्णांसाठी विलगीकरण कक्ष स्थापण केलेला आहे.मात्र त्या नंतर पॉझिटीव्ह व उपचाराची गरज असणा-या रूग्णांसाठी अता तीन ठिकाणी सामाजिक भावनेतून तालुक्यातील विविध पक्षाच्या व सामाजिक कार्यकर्त्यांच्या योगदानातून उपचार केंद्र सुरू आहेत. 

आमदार निलेश लंके यांच्या पुढाकाराने व तालुक्यातील सर्व डॉक्टर आणि मेडिकल असोशिएशन यांच्या वतीने प्रथम पारनेर येथील ग्रामिण रूग्णालयात 40 बेडचे सुसज्य असे उपचार कोविड हेल्थ केंद्र सुरू करण्यात आले. त्यानंतर शिवसेना पक्षाच्या वतीने व माजी विधानसभा उपाध्यक्ष विजय औटी यांच्या मार्गदर्शनाखाली मराठा विद्या प्रसारक समाजाच्या पारनेर महाविद्यालयाच्या मुलांच्या वसतीगृहात 50 बेडचे शिवसेना पक्षाच्या वतीने व स्वखर्चातून कोविड हेल्थ सेंटर सुरू केले गेले. त्या नंतर लगेचच मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या वतीने त्यांच्याच महाविद्यालयात मुलींच्या वसतीगृहात 120 बेडचे केवळ महिलांसाठी सुसज्ज व मोफत असे कोविड हेल्थ सेंटर संस्थेचे अध्यक्ष व माजी आमदार नंदकुमार झावरे व सचिव जी.डी. खानदेशेयांच्या हस्ते सुरू करण्यात आले.

त्यावेळी माजी आमदार झावरे यांनी तालुक्यात पाचशे बेडचे कोविड सेंटर असणे गरजेचे आहे असे सुतोवाच केले तोच धागा पकडून अता लवकरच टाकळी ढोकेश्वर नजिक कर्जुले हर्या परीसरात असणा-या राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयात आमदार निलेश लंके व निलेश लंके प्रतिष्ठाणच्या माध्यमातून एक हजार बेडचे कोविड हेल्थ सेंटर उभारण्यात येणार आहे. सर्वसामान्य व गोरगीबांना जर या रोगाची बाधा झालीच तर त्यांना तालुक्यातच चांगल्या प्रकारचे उपाचाराची सुविधा मिळावी या हेतूने आमदार लंके यांनी हा उपक्रम हाती घेतला आहे लवकरच त्याचा लोकार्पण सोहळा मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.

राजकिय स्पर्धेतून का होईना तालुक्यात कोविड हेल्थ सेंटरची संख्या वाढत आहे.तेथे गोरगीरीब रूग्णांवर उपचाराची सोय होत आहे ही मोठी आनंदाची बाब आहे.
टाकळी ढोकेश्वर येथील राजीव गांधी महाविद्यालायची कोविड सेंटरसाठी निवड करण्यापुर्वी तहसीलदार ज्योती देवरे गटविकास अधिकारी के.पी.माने अॅड. राहुल झावरे आरोग्य समितीचे सदस्य शरद झावरे यांनी पहाणीही केली आहे. येथे सुरू करण्यात येणा-या कोविड सेंटरचे उदघाटन उपमुख्यमंत्री अजीत पवार किंवा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते करण्याचा मानसही आमदार लंके यांचा आहे. 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Political competition for setting up of covid Health Center in Parner taluka