esakal | बाधितांना मरणानंतरही छळले ः मसणवट्यावरून राजकारण पेटले

बोलून बातमी शोधा

death body.jpg
बाधितांंना मरणानंतरही छळले ः मसणवट्यावरून राजकारण पेटले
sakal_logo
By
अशोक निंबाळकर

नगर ः केडगावमधील अमरधाममध्ये कोरोना बाधितांवर काल (रविवारी) अंत्यसंस्कार करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. कसे-बसे बारा 12 अंत्यसंस्कार करण्यात आले. ही माहिती केडगावकरांना होताच त्यांनी अमरधाम येत त्याला विरोध केला. त्यामुळे दुपारनंतर अंत्यसंस्काराची प्रक्रिया स्थगित करावी लागली.

जिल्ह्यातील वाढती कोरोना रुग्णांची मृत्यू संख्या पाहता महापालिकेकडून नालेगाव व केडगाव अमरधाममध्ये कोरोना बाधित मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. मागील दोन दिवसांत प्रत्येकी सहा कोरोना बाधित मृतदेहांवर केडगाव अमरधाममध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र, आज 12 मृतदेहांवर अंत्यसंस्कार होताच केडगावमधून कोरोना बाधित मृतदेहांवर अंत्यसंस्काराला विरोध सुरू झाला. केडगाव उपनगरात यामुळे कोरोनाचा प्रसार होऊ शकतो अशी भीतीपोटी विरोध करण्यात आलेला आहे.

नागरिकांचा वाढता विरोध लक्षात घेऊन केडगाव अमरधाममधून नालेगाव अमरधाममधील कर्मचाऱ्यांना मदतीसाठी बोलविण्यात आले. मात्र तेथेही अंत्यसंस्कार प्रक्रिया सुरू असल्याने कर्मचारी येऊ शकले नाहीत.

नालेगाव अमरधाममध्ये काल 37 कोरोना बाधित मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. नालेगाव अमरधाममध्ये नगर शहराबाहेरील कोरोना बाधित मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी आमदार संग्राम जगताप यांनी विरोध दर्शविल्यामुळे शहराबाहेरील कोरोना बाधित मृतदेहांवर केडगावमध्ये अंत्यसंस्कार होत होते. नागरिकांचा वाढता विरोध जिल्हा प्रशासनासमोर नवी डोकेदुखी ठरण्याची शक्‍यता आहे. आता केडगावच्या बदल्या नेमकी जागा कोणती शोधायची असा प्रश्‍न आता प्रशासनासमोर उभा राहिला आहे.

नगर शहरातील अमरधाममध्ये अंत्यसंस्काराचा मोठा पेच निर्माण झाला आहे. एकच स्मशानभूमी असल्याने तेथे अतिरिक्त ताण येत आहे. परिसरातील नागरिकांनीही त्यावर हरकत घेतली आहे. त्यामुळे आमदार संग्राम जगताप यांनीही जिल्ह्यातील कोरोनाबाधितावर त्याच्या गावी अंत्यसंस्कार करावेत, अशी भूमिका मांडली. तसेच शहरात इतर चार ठिकाणी ही सोय केल्यास ताण कमी होईल, असे प्रशासनाला पटवून दिले. त्यासाठी त्यांनी इतर चार ठिकाणांची पाहणीही केली.

शिवसेनेचा विरोध

दुसरीकडे शिवसेनेने वेगळी भूमिका घेतली आहे. त्यामुळे आघाडीतील पक्षनेत्यांमध्ये एकवाक्यता राहिलेली नाही. युवा सेनेचे प्रमुख विक्रम राठोड यांनी अमरधाममध्ये अंत्यसंस्कार करण्यास काहीच हरकत नाही. कोरोनाबाधितांचे मृतदेह दूरवर नेणे जिकीरीचे आहे. तसे केल्यास बाधितांची संख्या वाढू शकते. त्यामुळे प्रशासनाने इथेच अंत्यसंस्कार करावेत, अशी भूमिका निवेदनाद्वारे मांडली आहे.

या सर्व पार्श्वभूमीवर सर्वसामान्य नागरिकांचे हाल होत आहे. मसणवट्यातही राजकारण घुसल्याची भावना व्यक्त होत आहे.