
शेवगाव नगर परिषदेच्या कामगारांचा पगार थकल्याने विविध राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केले.
शेवगाव : नगरपालिका कामगारांच्या थकीत वेतनाच्या मागणीसाठी आमदार मोनिका राजळे यांच्या कार्यालयासमोर थाळीनाद आंदोलनासाठी निघालेल्या विविध संघटना व पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी आखेगाव रस्त्यावरच अडविले. त्यामुळे संतप्त आंदोलकांनी (स्व.) गोपीनाथ मुंडे चौकात थाळीनाद आंदोलन केले. त्यानंतर पोलिसांनी वंचित बहुजन आघाडी, मनसे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात नेले. काही वेळाने त्यांना सोडण्यात आले.
नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांचे वेतन चार महिन्यांपासून थकल्याने वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश महासचिव किसन चव्हाण, प्यारेलाल शेख, मनसेचे तालुकाध्यक्ष गणेश रांधवणे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दत्तात्रेय फुंदे, प्रशांत भराट, बाळासाहेब फटांगरे यांच्या नेतृत्वाखाली चार दिवसांपासून नगरपरिषद कार्यालयासमोर कर्मचाऱ्यांसह वेगवेगळ्या स्वरूपात आंदोलन करण्यात येत आहे.
या बाबत मंगळवारी झालेल्या बैठकीत तोडगा निघाला नाही. त्यामुळे काल (बुधवार) सर्व संघटना व कामगारांनी आमदार मोनिका राजळे यांच्या कार्यालयासमोर थाळीनाद आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानुसार आज सकाळी हे सर्व जण आखेगाव रस्त्यावरील त्यांच्या कार्यालयाकडे घोषणा देत निघाले तेव्हा पोलिसांनी त्यांना (स्व.) गोपीनाथ मुंडे चौकात अडवून पुढे जाण्यास मज्जाव केला. त्यामुळे संतप्त मोर्चेकऱ्यांनी तेथेच थाळीनाद आंदोलन केले.
पोलिस निरीक्षक रामराव ढिकले यांच्या, आंदोलन थांबविण्याच्या विनंतीस आंदोलकांनी नकार दिल्याने पोलिसांनी त्यांना ठाण्यात नेले.
संपादन - अशोक निंबाळकर