नगरपालिका पुन्हा कोल्हे गटाच्या हाता जाऊ नये, म्हणून मतदारांनी मला विधानसभेत पाठविले नाही

मनोज जोशी
Wednesday, 28 October 2020

विधानसभा निवडणुकीत मतदारांनी दिलेला कौल मला मान्य आहे. नगरपालिका पुन्हा कोल्हे गटाच्या कब्जात जाऊ नये म्हणून मतदारांनी मला विधानसभेत पाठविले नाही.

कोपरगाव (अहमदनगर) : विधानसभा निवडणुकीत मतदारांनी दिलेला कौल मला मान्य आहे. नगरपालिका पुन्हा कोल्हे गटाच्या कब्जात जाऊ नये म्हणून मतदारांनी मला विधानसभेत पाठविले नाही. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत माजी आमदारांना असलेले ३० हजारांचे मताधिक्य कुठे गेले? असा जाहीर सवाल नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी विवेक कोल्हे यांचे नाव न घेता पत्रकात केला आहे.

प्रसिद्धीसाठी दिलेल्या पत्रकात त्यांनी म्हटलं आहे की, मी नगराध्यक्ष व्हायच्या आधी 10 वर्षात झाली नाहीत इतकी कामे साडेतीन वर्षात केलेली आहेत. नगरपालिकेला तुम्ही निधी मिळू दिलेला नाही. 5 नंबर साठवण तलाव व्हावा म्हणून मी प्रयत्न करत होतो, पण तुम्ही अडथळेच आणले. म्हणून मतदारांनी तुमचा पराभव केला. नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत अनेकदा अडथळे तुम्हीच आणले. 

नविन पाणी पुरवठा योजनेवर देखरेख करणाऱ्या संस्थेला तुम्हीच हाकलून लावले, त्याच निसर्ग कॅन्सल्टन्सी संस्थेने आता वसुलीसाठी नगरपरिषदेवर दावा ठोकला आहे. निकाल विरोधात गेला तर होणारे प्रचंड आर्थिक नुकसानीला जबाबदार कोण? तुमच्यापैकी कुणी किती पैसे त्या योजनेच्या ठेकेदाराकडून उकळले याचा शोध घ्या. मेन लाईनवर नळजोड घेऊन प्रचंड पाणी वापरणारे पाणीचोर तुमच्याच भोवती आहेत. नेत्यांत धमक असेल तर त्यांनी त्यांच्याच चेल्याना मेन लाईनवरील त्यांचे नळजोड स्वतःहून तोडण्याचे आदेश द्यावेत. काही नगरसेवक ठेकेदारांना दमबाजी करून काही कामात भागीदार आहेत.

त्या कामांचे बिल द्या असे मला आजही सांगताहेत. डॉ.आंबेडकर मैदानाचे व अनेक रस्त्याच्या कामाचे कार्यदेश दिलेले आहेत. अनेक वर्षे नगरपरिषद ताब्यात असतांना काही करायचे नाही व सत्ता हातातून गेल्यावर बोंब मारायची हे डावपेच बंद करा असे ही शेवटी वाहडणे यांनी म्हंटले आहे.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Political story of the group of Kolhe and Vahadane in Kopargaon