
निवडणूका आल्या की सर्वसामान्यांच्या भावनेला हात घालणाऱ्या मुद्द्यावर राजकारण करण्यापेक्षा विकासाच्या मुद्द्यावर राजकारण करा.
संगमनेर ः भाजपाचा थिंक टॅंक असलेल्या आरएसएसच्या आदर्शांनी संभाजी महाराजांबद्दल केलेले कटू लिखाण पाहता, या विषयावर भाजपाने बोलणे व बेगडी प्रेम दाखवणे योग्य नाही.
पाच वर्ष भाजपाचे सरकार असूनही याबाबत त्यांनी काही केले नाही. आता निवडणुकांच्या तोंडावर यांना छत्रपती संभाजी महाराज आठवले, या पद्धतीला आमचा विरोध आहे, अशी टीका महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली.
संगमनेर येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. औरंगाबाद शहराचे संभाजीनगर असे नामकरण करा, अशी मागणी करणाऱ्या विरोधकांना त्यांनी शेलक्या शब्दात टोले लगावले.
ते म्हणाले, की महाविकास आघाडी सरकारच्या किमान समान कार्यक्रमात सर्वसामान्य माणूस केंद्रीभूत मानला आहे. राज्यातील काही गावांची नावे बदलल्याने त्याचा सर्वसामान्यांच्या जीवनमानावर काय परिणाम झाला, असा सवाल थोरात यांनी केला.
औरंगाबादचे संभाजीनगर असे नामकरण करण्याला कॉंग्रेसचा सातत्याने विरोध आहे. निवडणूका आल्या की सर्वसामान्यांच्या भावनेला हात घालणाऱ्या मुद्द्यावर राजकारण करण्यापेक्षा विकासाच्या मुद्द्यावर राजकारण करा. सर्वसामान्यांच्या जीवनात आनंद निर्माण होईल, अशी मांडणी करा, सूचना करा व आश्वासने द्या, असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला.
चिखलठाणा विमानतळाला महाजांचे नाव
ते म्हणाले, की छत्रपती शिवाजी व संभाजी महाराज आमची दैवते, श्रध्दास्थान आहेत. चिखलठाणा विमानतळाला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव देण्याचा ठराव व प्रस्ताव सहा महिन्यांपासून केंद्राकडे पाठवला आहे. अद्याप त्यावर निर्णय नाही. चंद्रकांतदादा पाटील व देवेंद्र फडणवीसांनी त्याकरीता प्रयत्न केल्यास उपयोग होवू शकतो.