esakal | शिवसेनेतील तेव्हाचे खलनायक आज ठरले नायक
sakal

बोलून बातमी शोधा

The politics Story of party entry of Shivsena NCP corporators at Parner

पारनेर नगरपंचायतीतील राजकीय उलथापालथ राज्यात गाजली. शिवबंधन तोडत हाती घड्याळ बांधणाऱ्या "त्या' पाच नगरसेवकांनी आज घड्याळाचा हात मागे लपवत पुन्हा शिवबंधन बांधले. या सगळ्या घडामोडींमध्ये नायक ठरलेले आमदार नीलेश लंके एकेकाळी शिवसेनेसाठी खलनायक होते, हे विशेष! 

शिवसेनेतील तेव्हाचे खलनायक आज ठरले नायक

sakal_logo
By
सनी सोनावळे

टाकळी ढोकेश्वर (अहमदनगर) : पारनेर नगरपंचायतीतील राजकीय उलथापालथ राज्यात गाजली. शिवबंधन तोडत हाती घड्याळ बांधणाऱ्या "त्या' पाच नगरसेवकांनी आज घड्याळाचा हात मागे लपवत पुन्हा शिवबंधन बांधले. या सगळ्या घडामोडींमध्ये नायक ठरलेले आमदार नीलेश लंके एकेकाळी शिवसेनेसाठी खलनायक होते, हे विशेष! 
पारनेरच्या शिवसेना नगरसेवकांचा "राष्ट्रवादी'त प्रवेश जसा स्थानिक राजकारणात चर्चेचा विषय होता, तसा किंबहुना त्याहून अधिक राज्य पातळीवर चर्चेचा ठरला. 2018 मध्ये 27 फेब्रुवारी रोजी विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजय औटी यांनी आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्यात तेव्हा शिवसेनेचे तालुकाप्रमुख असलेले नीलेश लंके यांना टाळण्यात आले होते. त्याच मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत लंके यांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. ठाकरे यांच्या वाहनांच्या ताफ्यावर दगडफेकदेखील झाली होती. मात्र, ती माझ्या कार्यकर्त्यांनी केली नाही, असे लंके यांनी सांगितले होते. त्यानंतर लंके यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली. नंतर लंके यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करून राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. पुढे ते आमदारही झाले. त्या वेळी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेकडून उमेदवारीची तयारी करणाऱ्या व त्या वेळी एक कार्यकर्ता म्हणून वावरणाऱ्या नीलेश लंके यांनीच आज शिवसेनेची राजकीय इभ्रत वाचविली, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. 
शिवसेनेतून राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये दाखल झालेल्या नगरसेवकांशी लंके यांनी अगोदर शिष्टाई करत नंतर त्यांना उपमुख्यमंत्री अजित पवार व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे नेले. अन्यथा ते आपल्या राजीनाम्यावर ठाम होते. 
लंके यांनी त्यांना, "आपण पारनेर शहराच्या पाणीयोजना रखडल्यामुळे स्थानिक नेतृत्वावर नाराज आहात; मात्र ही सर्व कैफियत आपण पक्षश्रेष्ठींसमोर मांडू आणि मार्ग काढू,' असे सांगितले आणि एकाच दगडात दोन पक्षी मारले. नगरसेवकांना "राष्ट्रवादी'त नेऊन परत शिवसेनेत पाठविले खरे; मात्र शिवसेना नेते विजय औटी यांची तक्रार थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर त्यांच्याच नगरसेवकांच्या तोंडून ऐकवली आणि पाणीयोजनेचा शब्ददेखील घेतला. औटी यांचा शिवसेनावाढीसाठी असणारा त्याग लक्षात घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे विश्वासू मिलिंद नार्वेकर यांनी या घडामोडींत भलेही मोठे योगदान दिले असेल; मात्र खरे हीरो ठरले ते पारनेरचे आमदार नीलेश लंके. 
राज्याच्या राजकारणात ही बाब आज संपेल; मात्र पारनेरच्या राजकारणात हा विषय खोलवर रुचणार आहे. आजच्या घडामोडींनी आमदार लंके यांनी "राष्ट्रवादी'वरची तालुक्‍यातील पकड ढिली होऊ न देता अप्रत्यक्षपणे शिवसेनेच्या गुहेत प्रवेश करत शिवसेना नेते विजय औटी यांचे राजकीय पंख छाटण्याचे काम सुरू केल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे. लंके यांची ही मास्टरमाइंड खेळी पारनेरच्या राजकारणात नेमका कोणता रंग भरते, हे थोड्याच दिवसांत समजेल! 

loading image