esakal | कुकडीच्या पाण्यात असं शिजतं राजकारण...पुण्यातील या नेत्यांपुढे नगरकर होतात हतबल
sakal

बोलून बातमी शोधा

Politics taking place in Ahmednagar-Pune district from Kukdi canal

कुकडीच्या या प्रकल्पाचे पाणी नगरमार्गे थेट सोलापूर जिल्ह्यातील करमाळा आणि बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यापर्यंत जाते. पुणे जिल्ह्यातील नेते इतर दोन जिल्ह्यावर अन्याय करतात, हा आतापर्यंतचा अनुभव आणि आरोप आहे.

कुकडीच्या पाण्यात असं शिजतं राजकारण...पुण्यातील या नेत्यांपुढे नगरकर होतात हतबल

sakal_logo
By
अशोक निंबाळकर

नगर ः कुकडी प्रकल्पातील उन्हाळी आवर्तनामुळे नगर जिल्ह्यात राजकीय गदारोळ सुरू आहे. तसा दरवर्षीच कुकडीच्या पाण्याला हा राजकीय तवंग येतो. यंदा जरा जास्तच आला आहे. माजी पालकमंत्री राम शिंदे आणि विद्यमान आमदार बबनराव पाचपुते यांनी उपोषण केल्याने कुकडीचे पाणी चांगलेच पेटले. आवर्तनावरून राष्ट्रवादीवर आरोप-प्रत्यारोप झाले. त्यातल्या त्यात कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांना टार्गेट करण्यात आलं. आवर्तनाला झालेला उशिर, पाणीवाटप अशी त्याची कारणे पुढे केली जातात.

पुणेकर म्हणतात, पाणी आमचंच

गेल्या तीन पिढ्यांपासून कुकडीचे राजकारण सुरू आहे. कुकडी प्रकल्पांतर्गत डिंबे, पिंपळगाव जोगे, वडज, येडगाव, माणिकडोह ही धरणे येतात. या सर्वांचा मिळून कुकडी प्रकल्प होतो. हा प्रकल्प पुणे जिल्ह्यात आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील नेते नेहमीच कुकडीचे पाणी आमचेच आहे. आम्हाला जेवढे तेवढे लागते तेवढे घेणारच. त्यानंतर उर्वरित पाण्याचे नियोजन कसे करायचे, हे तुमचे तुम्ही ठरवा. एकंदरीत अशीच त्यांची भूमिका असते. त्यात दिलीप वळसे पाटील, वल्लभ बेनके ही मंडळी अग्रेसर असतात. ही नेते मंडळी राष्ट्रवादीची आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच रडावर असते.

पाण्यामुळे फुलले राजकीय मळे

कुकडीच्या या प्रकल्पाचे पाणी नगरमार्गे थेट सोलापूर जिल्ह्यातील करमाळा आणि बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यापर्यंत जाते. पुणे जिल्ह्यातील नेते इतर दोन जिल्ह्यावर अन्याय करतात, हा आतापर्यंतचा अनुभव आणि आरोप आहे. टेल टू हेड म्हणजे अगोदर खालच्या भागाला पाणी जाणार मग वरच्या भागाला असे सूत्र कायद्यानुसार ठरले आहे. मात्र, नगर आणि सोलापूर जिल्ह्याला आजही पुरेसे पाणी मिळत नाही. यावर गेल्या तीन पिढ्यांपासून राजकारण सुरू आहे. या पाण्याच्या राजकारणाने नगर,पुणे आणि सोलापूरमधील नेत्यांचे राजकीय मळे फुलले. कर्जतमध्ये सदाशिव लोखंडे, राम शिंदे, श्रीगोंद्यात बबनराव पाचपुते,राहुल जगताप, करमाळ्याचे दिवंगत नेते दिगंबरराव बागल यांना आमदारकी मिळवून देण्यात कुकडीच्या पाण्याचा मोठा वाटा आहे. पण याच पाण्याने काहींची आमदारकी घालवली. एकंदरीत तिन्ही जिल्ह्यातील राजकारण हे पाण्याभोवती फिरते.

तीन पिढ्यांचा संघर्ष

"सकाळ"चे कार्यकारी संपादक डॉ. बाळ ज. बोठे पाटील हे पाण्याच्या राजकारणाबाबत निरीक्षण नोंदवताना म्हणतात, कुकडीच्या पाण्याचा संघर्ष हा आजचा नाही, तो गेल्या तीन पिढ्यांपासून आहे. पहिल्या पिढीत माजी पाटबंधारे मंत्री (कै.) ए.बु. ऊर्फ आबासाहेब निंबाळकर यांनी त्यासाठी संघर्ष केला. कुकडी प्रकल्पाच्या स्थापनेतच त्यांचा मोठा वाटा आहे. दुसरे माजी मंत्री (कै.) बाबूराव भारस्कर यांनीही पाण्यासाठी रान पेटवले. नगर जिल्ह्यात सर्वाधिक आंदोलने झाली ती श्रीगोंदा आणि कर्जत तालुक्यात. नगर तालुक्यानेही तेच केलं.

पाणीच केंद्रबिंदू

श्रीगोंद्यातील आमदार बबनराव पाचपुते, (कै.) शिवाजीराव नागवडे, (कै.) कुंडलिकराव जगताप, घनश्याम शेलार, अण्णा शेलार, बाबासाहेब बोस आदी नेत्यांनी नेहमी कुकडी आणि घोडच्या आवर्तनाबाबत आवाज उठवला. यातील पाचपुते हे सर्वाधिक काळ सत्तेवर होते, पालकमंत्रीही होते. श्रीगोंद्यातील राजकारणाचाच नव्हे तर कुकडी पट्टयातील राजकारणाचा पाणी हाच केंद्रबिंदू राहिला. त्यात कालव्यांची वहनक्षमता, पाण्याची पळवापळवी, पाण्याची गळती, आवर्तनातील उशिरा आदी मुद्यांवर राजकारण होते. निवडणुका त्यात मुद्यांवर होतात.

सर्वाधिक पाणी पुण्यालाच का

कुकडीच्या पाण्याबाबत श्रीगोंद्यातील पत्रकार संजय काटे सातत्याने अभ्यासपूर्ण भूमिका मांडत असतात. ते सांगतात, पाण्याच्या प्रश्नाबाबत पुणे जिल्ह्यातील नेते एकत्र येतात. नगर जिल्ह्यात तसे होत नाही. त्यामुळेच नगरवर सातत्याने अन्याय झाला. पुणे जिल्ह्यात ५२ हजार हेक्टर क्षेत्र कुकडी प्रकल्पांतून सिंचनाखाली येते. नगर आणि सोलापूरचे ९० हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आहे. त्यात श्रीगोंदा ३२ हजार, कर्जतमध्ये ३० हजार हेक्टर आहे. पुण्यात कमी क्षेत्र असतानाही सर्वाधिक पाणी त्यांना मिळते.

पुणे जिल्ह्यातील नेते सांगतात, कुकडीसाठी आमच्या जमिनी गेल्या आहेत. त्यामुळे पाण्यावर आमचा हक्क आहे. यात सर्वाधिक अग्रेसर असतात ते वळसे पाटील आणि बेनके. कुकडी प्रकल्पावर पुणेकरांचे म्हणजेच राष्ट्रवादीचेच वर्चस्व राहिले आणि आहे. त्यांच्यापुढे नगरचे नेते हतबल असतात.

श्रीगोंदा नेहमी विरोधात

श्रीगोंदा तालुक्यात जो विद्यमान आमदार असतो, त्याला पाण्यावरूनच विरोधक टार्गेट करतात. सध्या पुण्यापासून सोलापूरपर्यंत राष्ट्रवादीचे सर्व आमदार आहेत. किंवा त्यांना मानणारे आहेत. एकटे बबनराव पाचपुते हेच भाजपचे आमदार आहेत. राष्ट्रवादीत असताना त्यांची भूमिका काहीसी बोटचेपी होती. आता ते भाजपात असल्याने आक्रमक झाले आहेत. राष्ट्रवादीकडून श्रीगोंद्याचे नेतृत्व करताना राहुल जगताप पाण्याबाबत एकटे पडले होते. त्यावेळी भाजपची सत्ता असल्याने त्यांच्या संघर्षाला मर्यादा आल्या.

कुकडीच्या पाण्यासाठी खरा संघर्ष कर्जत तालुक्यानेच केला. टेलला असलेल्या करमाळा तालुक्यात कधीच आंदोलने झाली नाही. दिवंगत नेते दिगंबरराव बागल आमदार असतानाच त्यांनीच थोडीफार आवाज उठविला. आणि कुकडी प्रकल्पात नसतानाही मांगी तलावात सातत्याने पाणी सोडण्यास सरकारला भाग पाडले. युती सरकारच्या काळात पाणी आल्याने कर्जत त्यांच्यामागे उभा राहिला, हेही नाकारता येत नाही. मी भाजपात असताना पाण्यासाठी अनेक आंदोलने केली. भोसा खिंडीसाठी लढा दिला. परंतु पुणे जिल्ह्याने नेहमीच नगरवर अन्याय केला. टेल टू हेड सूत्र असले तरी वरची मंडळी कालवे फोडून पाणी घेतात. दिलीप वळसे पाटलांपुढे नगरचे नेते कोणीच बोलत नाही. राष्ट्रवादीचे आमदारही ते ज्येष्ठ म्हणून गप्प असतात. आता रोहित पवार यांनी कर्जतवरील अन्यायाची कसर भरून काढली पाहिजे. कारण टेलला आजही पाणी मिळत नाही.

- कैलास शेवाळे, ज्येष्ठ नेते, काँग्रेस, कर्जत.

 

या धरणांचा मिळून झाला कुकडी प्रकल्प

महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यामधील कुकडी नदीवर येडगावमाणिकडोह ही धरणे, मीना नदीवरील वडज धरण, पुष्पावती नदीवरील पिंपळगावजोगे धरण, घोड नदीवरील डिंभे धरण, मांडवी नदीवरील चिल्हेवाडी धरण, ही सर्व धरणे, त्यांचे कालवे, इतर पाटबंधारे आणि बस्ती-सावरगाव येथील एक पिक‍अप वियर यांनी मिळून कुकडी प्रकल्प बनला आहे.

जुन्नर, आंबेगाव, शिरूर, पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, करमाळा आणि अलिकडे बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यांना या प्रकल्पाचा फायदा होतो.