पाणीच पाणी चोहीकडे रस्ते गेले कुणीकडे, पारनेरची स्थिती

मार्तंड बुचुडे
Tuesday, 29 September 2020

दुसरीकडे अति पावसाने तालुक्‍यातील अनेक गावांचे रस्ते वाहून गेले. विरोली ते हत्तलखिंडी या दोन गावांना जोडणारा सुमारे चार किलोमीटरचा रस्ता पावसाने उखडून गेला.

पारनेर ः तालुक्‍यात गेली आठवडाभर झालेल्या मुसळधार पाऊसामुळे तालुक्‍यातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकासान झाले आहे. अनेक ठिकाणी पिके पाण्याखाली गेली आहेत. अति पाऊसामुळे अनेक गावचे रस्ते वाहून गेले. पावसाने उघडीप दिल्याने महसूल विभागाने नुकसानीचे पंचनामे करावेत. तर, रस्त्यांची दुरूस्ती करावी अशी मागणी होत आहे. 

तालुक्‍यात गेली अनेक वर्षात पहिल्यांदाच वारेमाप पाऊस झाला. चांगल्या पावसाने नदी, नाले, तालव व विहिरी तुडुंब भरल्या आहेत. पारनेर येथून विसापूर तलावात जाऊन मिळणाऱ्या हंगा नदीला कधी नव्हे एवढा मोठा पूर आला. भरपूर पाऊस झाल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न मिटला आहे. मात्र, पावसाने शेती पिकांचे व रस्त्यांचे मोठे नुकसान झाले. 

पारनेरसह ढवळपुरी, टाकळी ढोकेश्वर, वाडेगव्हाण तसेच कान्हूपठार या भागातील शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. ढवळपुरी व टाकळी ढोकेश्वर परिसरात टॉमॅटो, कान्हूर पठार परिसरात कांदा व वाटाणा, सुपे परिसरात कांद्यासह फुलशेती व भाजापाल्याचे मोठे नुकसान झाले आहे. 

दुसरीकडे अति पावसाने तालुक्‍यातील अनेक गावांचे रस्ते वाहून गेले. विरोली ते हत्तलखिंडी या दोन गावांना जोडणारा सुमारे चार किलोमीटरचा रस्ता पावसाने उखडून गेला. या रस्त्याने पायी चालणे सुद्धा मुश्‍कील झाले आहे. आता पावसाने उघडीप दिल्याने महसूल विभागाने शेतीचे पंचनामे करावे आणि रस्त्याची दुरूस्ती करण्याची मागणी सरपंच प्रभाती मोरे व उपसरंपच राजश्री बुचडे यांनी केली. 

तालुक्‍यातील नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे कारवेत, तसेच शेतकऱ्यांना शंभर टक्के पिकविमा मिळावा, त्या साठी नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करावेत. तालुक्‍यातील खराब झालेल्या रस्त्यांची दुरूस्ती करावी.

- अनिल देठे, शेतकरी संघटना 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Poor condition of roads in Parner taluka