नगराध्यक्षपदासाठी पोपळघट, कासार यांचे अर्ज, तनपुरेच ठरवणार उमेदवार

विलास कुलकर्णी
Tuesday, 22 September 2020

अनिता पोपळघट यांच्या उमेदवारी अर्जावर सूचक म्हणून नंदकुमार तनपुरे, तर अनुमोदक म्हणून प्रकाश भुजाडी यांच्या सह्या आहेत. अनिल कासार यांच्या उमेदवारी अर्जावर सूचक म्हणून राधा साळवे व अनुमोदक म्हणून संगीता आहेर यांच्या सह्या आहेत.

राहुरी : राहुरी नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी अनिता पोपळघट व अनिल कासार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. येत्या शुक्रवारी (ता. 25) नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक होणार आहे. दोन्ही उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत जनसेवा मंडळाचे असल्याने नगराध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध होणार आहे.

राहुरी पालिकेचे नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे यांनी विधानसभा निवडणुकीत विजय मिळविल्यानंतर नगराक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे, नगराध्यक्षपद रिक्त होते. नगराध्यक्षपद इतर मागास प्रवर्गासाठी आरक्षित आहे.

अनिता पोपळघट यांच्या उमेदवारी अर्जावर सूचक म्हणून नंदकुमार तनपुरे, तर अनुमोदक म्हणून प्रकाश भुजाडी यांच्या सह्या आहेत. अनिल कासार यांच्या उमेदवारी अर्जावर सूचक म्हणून राधा साळवे व अनुमोदक म्हणून संगीता आहेर यांच्या सह्या आहेत.

राहुरी नगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत जनसेवा मंडळाचे पूर्ण बहुमत आहे. राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने, मुंबई येथे उपचार घेत आहेत. ते येत्या गुरुवारी (ता. 24) राहुरीत येणार असल्याचे समजते.

जनसेवा मंडळाचे अध्यक्ष माजी खासदार प्रसाद तनपुरे, राहुरी बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे, पालिकेतील गटनेत्या डॉ. उषा तनपुरे, मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या बैठकीनंतर एका नावावर शिक्कामोर्तब होणार आहे. त्यामुळे निवडणूक बिनविरोध होणार असल्याने, नगराध्यक्षपदासाठी कुणाची वर्णी लागते. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अहमदनगर
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Popalghat, Kasar's application for the post of Mayor