युवकांनी गावाच्या विकासासाठी पुढाकार घ्यावा : पोपटराव पवार

सनी सोनावळे
Wednesday, 23 September 2020

पद्मश्री पोपटराव पवार म्हणाले, गावातील तरुणवर्ग राजकारणात जास्त योगदान देतो. त्यातून एकमेकांविषयी मने कलुषित होतात आणि गावात गावाला गावपण देणाऱ्या व्यक्तीला किंवा चळवळीला बाधा निर्माण होईल, त्यापेक्षा त्याने गावाच्या उभारणीत योगदान द्यावे.

टाकळी ढोकेश्वर (अहमदनगर) : सरपंच परिषद करत असलेले कामे वृत्तपत्र व सोशल नेटवर्किंग साईटवर नेहमी पाहत असतो. वेळोवेळी सरपंच हिताच्या गोष्टी तुम्ही करत असता, त्याकरता माझेही सहकार्य आपणांस राहील. सरपंच परिषद करत असलेले कामे स्तुत्य असल्याचे पद्मश्री पोपटराव पवार यांनी सांगितले.

आदर्श गाव हिवरे बाजार येथे सरपंच परिषदेचे पदाधिकारी प्रदेशाध्यक्ष दत्ता काकडे, उपाध्यक्ष अनिल गिते, विकास जाधव, आबा पाटील, विजय शेंडे यांनी पवार यांची भेट घेऊन ग्रामपंचायत व सरपंच यांचे प्रश्न, जनतेतील सरपंच निवड रद्द, केंद्राचा अखर्चित निधी राज्यशासनाने घेतला, जलयुक्त शिवार योजना, प्रशासक निवड या विषयांवर चर्चा करून सरपंच परिषदेचे सुरू असलेले उपक्रम सांगण्यात आले. त्यावेळी पवार बोलत होते.

पवार म्हणाले, गावातील तरुणवर्ग राजकारणात जास्त योगदान देतो. त्यातून एकमेकांविषयी मने कलुषित होतात आणि गावात गावाला गावपण देणाऱ्या व्यक्तीला किंवा चळवळीला बाधा निर्माण होईल, त्यापेक्षा त्याने गावाच्या उभारणीत योगदान द्यावे. सध्याच्या तरुणाईबद्दल बोलताना अनेक गोष्टीबद्दल खंत व्यक्त केली. गावोगाव लोक धार्मिक कार्यक्रमासाठी एकत्र येतात तसे कालानुरुप शासकीय योजना आणि अभियानात गावाने भाग घेतला तर गावे आणि एकमेकांची मन एकत्र करण्याचे ते माध्यम आहे. स्वयंपूर्ण, स्वच्छ, सुंदर आदर्श खेडी निर्माण करण्यासाठी आपण एकत्र प्रयत्न करू, असे आश्वासन पवार यांनी दिले. 

संपादन : सुस्मिता वडतिले


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Popatrao Pawar said that the youth should take initiative for the development of the village