प्रसाद शुगरने शेतकऱ्यांचं बिल थकवलं, शेतकरी संघटना झाली आक्रमक

गौरव साळुंके
Sunday, 18 October 2020

सदर हंगामात प्रसाद शुगरने एकूण गाळप केलेल्या पाच लाख सात हजार 932 मेट्रिक टन उसापैकी कार्यक्षेत्राबाहेरील सुमारे एक लाख 900 मेट्रिक टन उसाचे गाळप केले.

श्रीरामपूर ः प्रसाद शुगर कारखान्याने 2018-19 गाळप हंगामात घेतलेल्या उसापैकी राहुरी तालुक्यातील ऊस पुरवठादार शेतकऱ्यांना प्रतिटन दोन हजार 321 रुपायांप्रमाणे ऊसाची बिले अदा केली. परंतु श्रीरामपूरसह नेवासा तालुक्यातील ऊस पुरवठादार शेतकऱ्यांची प्रतिटन केवळ दोन हजार 100 रुपायांप्रमाणेच बिले अदा केली.

सदर हंगामात प्रसाद शुगरने एकूण गाळप केलेल्या पाच लाख सात हजार 932 मेट्रिक टन उसापैकी कार्यक्षेत्राबाहेरील सुमारे एक लाख 900 मेट्रिक टन उसाचे गाळप केले.

श्रीरामपूर सह नेवासा तालुक्यातील ऊस पुरवठादार शेतकऱ्यांना प्रतिटन दोन हजार 221 रुपये कमी मिळाली. त्यामुळे प्रसाद शुगरकडे गेल्या दोन वर्षांपासून शेतकर्यांची सुमारे दोन कोटी 23 लाख रुपये ऊस बिलाची थकीत रक्कम थकली आहे.

ऊस दर फरकाची प्रतिटन 221 रुपायांप्रमाणे थकीत रक्कम ऊसदर नियंत्रण आदेशातील तरतुदीनुसार 15 टक्के व्याजासह वसूलीसाठी शेतकरी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष बाळासाहेब पटारे यांच्या नेतृत्वाखाली ऊस पुरवठादार शेतकऱ्यांनी आंदोलनाच्या मार्गाने लढा सुरु केल्याने प्रादेशिक सहसंचालक (साखर) नगर कार्यालयाने लेखापरीक्षण अहवालासह प्रस्ताव पुढील आदेशासाठी साखर आयुक्त पुणे यांच्याकडे सादर केले.

या पार्श्वभूमीवर शेतकरी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष पटारे यांनी शिष्टमंडळासह पुणे येथील साखर संकुल कार्यालयात साखर आयुक्त शेखर गायकवाड यांची नुकतीच भेट घेतली. भेटीत झालेल्या चर्चेत, अंतिम ऊस दर अदा करतांना ऊस पुरवठादारामध्ये कार्यक्षेत्रातील व कार्यक्षेत्राबाहेरचा असा भेदभाव करता येत नाही. 

अशी शुगर केन कंट्रोल ऑर्डर 1966 मध्ये स्पष्ट तरतूद असल्याचे तसेच उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने यासंबंधीच्या याचिकेमध्ये दोन ऑगस्ट 2010 रोजीच्या दिलेल्या निकालपत्रात साखर कारखान्याने सर्व ऊस पुरवठादारांना एकसमान ऊस दर देण्याचे आदेश दिल्याचे पटारे यांनी साखर आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले. त्यामुळे ऊस बिलाच्या फरकाची थकीत रक्कम व्याजासह अदा केल्याशिवाय प्रसाद शुगर कारखान्याला यंदाच्या गाळप हंगामाचा परवाना देऊ नये.

विनापरवाना गाळप सुरू केल्यास कारखान्याविरुद्ध आरआरसी कारवाई करून ऊस उत्पादकांची थकीत रक्कम व्याजासह अदा करण्याची मागणी शेतकरी संघटनेने निवेदनाद्वारे केली आहे. प्रसाद शुगरकडुन ऊस उत्पादक शेतकऱ्यांची थकीत उसबिले वसूल करून देण्याचे आश्वासन साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिल्याचे पटारे यांनी सांगितले.
संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Prasad Sugar exhausted the farmers' bill