

शिर्डी : प्रवरा नदी दुष्काळी टापू ओला करीत थोरली बहीण असलेल्या गोदामाईच्या भेटीला निघाली. जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शिर्डी विधानसभा मतदारसंघात हा छोटासा नदीजोड प्रकल्प आज प्रत्यक्षात आला. या दोन महत्त्वाच्या नद्या जोडणाऱ्या कातनाल्याच्या कडेचे अडथळे दूर करून हे पाणी जिरायत टापूत नेण्यासाठी माजी खासदार डाॅ. सुजय विखे पाटील यांनी यंत्रणा उभी केली. एकेकाळचा दुष्काळी भाग जमेल तेवढा ओला करीत प्रवरेचे पाणी जिरायत टापूतून गोदावरीच्या लाभक्षेत्रातील बागायत भागाकडे निघाले. दीर्घकाळ रेंगाळलेल्या निळवंडे प्रकल्पामुळे कातनाल्याच्या माध्यमातून ही किमया घडली.