प्रीतिसुधाजी संकुलास 'इस्रो'तर्फे दुर्बीण

सतिश वैजापूरकर
Sunday, 6 December 2020

'इस्रो'मध्ये कार्यरत असलेले शास्त्रज्ञ धनेश बोरा यांनी वर्षभरापूर्वी येथे येऊन विद्यार्थ्यांसोबत अवकाश निरीक्षण व चांद्रमोहीम विषयावर संवाद साधला.

राहाता (अहमदनगर) : प्रीतिसुधाजी शैक्षणिक संकुलाला भारतीय अवकाश संशोधन संस्थेने ('इस्रो') दुर्बीण भेट दिली. यामुळे अवकाशातील ग्रह- ताऱ्यांचे निरीक्षण करण्याची आवड विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होईल. त्यांच्यामध्ये संशोधनवृत्ती वाढावी, यासाठी 'इस्रो'तर्फे असे विविध उपक्रम राबविले जातात, असे प्रतिपादन शिर्डीतील डॉ. एम. वाय. देशमुख यांनी केले.
 
'इस्रो'मध्ये कार्यरत असलेले शास्त्रज्ञ धनेश बोरा यांनी वर्षभरापूर्वी येथे येऊन विद्यार्थ्यांसोबत अवकाश निरीक्षण व चांद्रमोहीम विषयावर संवाद साधला. त्यावेळी त्यांनी 'इस्रो'तर्फे तयार करण्यात येणाऱ्या शक्तिशाली दुर्बिणी व त्यांचे वाढते महत्त्व, याबाबत सविस्तर माहिती दिली. त्यांनी जाहीर केलेली ही दुर्बिणीची भेट दोन दिवसांपूर्वी शाळेला सुपूर्द करण्यात आली. पूजन करून शनिवारी सायंकाळी ही दुर्बीण विद्यार्थ्यांना अवकाश निरीक्षणासाठी खुली करण्यात आली. या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात डॉ. देशमुख बोलत होते. 

प्राचार्य इंद्रभान डांगे, डॉ. पी. जी. गुंजाळ, प्राचार्य ज्ञानेश डांगे, संचालिका पूनम डांगे, अभियंता शरद निमसे, ग्रंथविक्रेते डी. यू. जोशी, उद्योजक राजेंद्र कोते व अभय दुनाखे उपस्थित होते. प्राचार्य ज्ञानेश डांगे म्हणाले, इस्रो'ने शाळेला भेट दिलेल्या दुर्बिणीद्वारे दिसणारे ग्रह-तारे डोळ्याने दिसणाऱ्या प्रतिमेच्या १९ पट मोठे दिसतात. त्यामुळे अवकाश निरीक्षण करताना विद्यार्थी गुंग होऊन जातात.'

'इस्रो'ने प्रीतिसुधाजी शैक्षणिक संकुलात छोटेसे तारांगण उभारावे, यासाठी आम्ही त्यांच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्यांचा सकारात्मक प्रतिसाद मिळतो आहे. राहाता परिसरातील सर्व विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरेल, असे छोटे तारांगण उभारण्याची आमची तयारी आहे. 
- इंद्रभान डांगे, प्राचार्य

संपादन - सुस्मिता वडतिले 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Preetisudhaji Educational Complex has been telescope visited by the Indian Space Research Organization