संतापजनक! आरोग्य केंद्राने दाखवला बाहेरचा रस्ता अन् रस्त्यावरच झाली प्रसूती | Ahmednagar | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ahmednagar news

संतापजनक! आरोग्य केंद्राने बाहेरचा रस्ता दाखवला; रस्त्यावरच झाली प्रसूती

राहुरी (जि. अहमदनगर) : देवळाली प्रवरा येथे गुरुवारी सकाळी सहा वाजता एक महिला प्रसूतीच्या मरणकळा घेऊन प्राथमिक आरोग्य केंद्रात (Primary health centre) आली. तिचे प्रसूतीचे (Maternity) दिवस भरले नाहीत. म्हणून आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांनी तिला बाहेरचा रस्ता दाखविला. कडक्याच्या थंडीत जड पावलांनी आरोग्य केंद्राबाहेर आल्यावर तिच्या कळा पुन्हा वाढल्या. परिसरातील महिला मदतीला धावल्या. सकाळी पावणे नऊ वाजता भर रस्त्याच्या कडेला साड्यांच्या आडोशात तिची प्रसूती झाली.

प्रसूतीनंतर आरोग्य केंद्राचे औदार्य

सुमन अरुण शिंदे (रा. देवळाली प्रवरा) असे बाळंतिणीचे नाव आहे. त्यांची प्रसूतीच्या मरण यातनेतून सुखरूप सुटका झाल्यावर आरोग्य केंद्रातील अधिकारी-कर्मचारी भानावर आले. बाळ- बाळंतिणीला आरोग्य केंद्रात दाखल करून, औदार्य दाखविण्यात आले. ही संतापजनक घटना वाऱ्यासारखी शहरात पसरली. शेकडो नागरिक व महिलांनी प्राथमिक आरोग्य केंद्राबाहेर गर्दी करून, तीव्र शब्दांत निषेध केला.

हेही वाचा: छेडछाडीला कंटाळून अल्पवयीन मुलीची आत्महत्या; तिघांजणावर गुन्हा दाखल

रिपब्लिकन पक्ष (आठवले गट) जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात म्हणाले, देवळाली प्रवरा आरोग्य केंद्रात वर्षानुवर्षे ठाण मांडून बसलेल्या आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांची मनमानी सुरू आहे. माणुसकीला काळीमा फासणारी घटना आहे. परिसरातील महिलांनी साड्यांचा आडोसा करून, भर रस्त्याच्या कडेला बाळंतिणीची सुखरूप सुटका केली. या घटनेची चौकशी करून, दोषी वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी. अन्यथा रिपब्लिकन पक्षातर्फे तीव्र आंदोलन छेडले जाईल. असा इशारा थोरात यांनी दिला आहे.

आरोग्य कर्मचारी निर्दोष....

'सकाळ'शी बोलतांना तालुका आरोग्य अधिकारी डॉ. दीपाली गायकवाड म्हणाल्या, "देवळाली प्रवरा येथे आरोग्य केंद्रात प्रत्यक्ष जाऊन चौकशी केली. सुमन शिंदे यांच्या सोनोग्राफी अहवालानुसार १५ फेब्रुवारी रोजी प्रसूतीची तारीख आहे. तिच्या शरीरात रक्ताची कमतरता आहे. तपासणी प्रसंगी तिला प्रसूतीच्या कळा नव्हत्या. प्रसूतीला एक महिना वेळ असल्याने, ॲडमिट करून घेतले नाही. त्यावेळी रुग्ण महिलेचा पती दारूच्या नशेत होता. दवाखान्यातून बाहेर पडल्यावर तिला कळा आल्या. त्यात, आरोग्य केंद्रातील अधिकारी कर्मचाऱ्यांचा दोष नाही. प्रसूत महिलेशी संवाद साधला. तिची व तिच्या सासूची कोणतीही तक्रार नाही. याप्रकरणी आमचे कर्मचारी निर्दोष आहेत.

हेही वाचा: माणूसकीला काळिमा! ड्रायव्हर, घरकाम करणाऱ्यांनी लिफ्ट वापरल्यास ३०० रूपयांचा दंड

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top