तिरूपती देवस्थानचे पदाधिकारी आले साईदरबारी, कोरोनावर नियंत्रणाची कहाणीही सांगितली

सतीश वैजापूरकर
Tuesday, 8 September 2020

आमचे काही कर्मचारी डोंगराहून खाली गावात मुक्कामास जात. त्यांना तेथून बाधा होत असावी, असे आमच्या लक्षात आले. त्यानंतर आम्ही त्यांची देवस्थानातच मुक्कामाची व्यवस्था केली.

शिर्डी ः आंध्र प्रदेशातील तिरुपती बालाजी देवस्थानाचे अध्यक्ष, माजी खासदार वाय. व्ही. सुब्बारेड्डी यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह साई संस्थानला भेट दिली. कोविडवर नियंत्रण ठेवत दर्शनव्यवस्था कशी सुरळीत ठेवायची, याबाबतचा कानमंत्र त्यांनी साई संस्थानच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिला.

खबरदारीची तपशीलवार माहिती दिली. तिरुपती देवस्थानाचे दैनंदिन उत्पन्न सध्या एक कोटींवर, तर भाविकांची संख्या बारा हजारांवर गेली. कोविड संसर्गावर तूर्त तरी नियंत्रण असल्याचे त्यांनी सांगितले. 

माजी खासदार सुब्बारेड्डी, तिरुपती देवस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिलकुमार सिंघल, कार्यकारी अधिकारी धर्मा रेड्डी व दोन पुजाऱ्यांच्या शिष्टमंडळाने दोन दिवसांपूर्वी साई संस्थानला सदिच्छा भेट दिली. पुढील महिन्यात तेथे होणाऱ्या ब्रह्मोत्सवाचे निमंत्रण संत मंडळींना देण्यासाठी हे शिष्टमंडळ हृषिकेश येथे गेले होते. तेथून परतताना त्यांनी शिर्डीला भेट दिली. 

कोविडचा संसर्ग वाढत असताना आंध्र प्रदेशातील तिरुपती देवस्थानाने आपली दर्शनव्यवस्था बऱ्यापैकी सुरळीत ठेवली. सध्या रोज 12 ते 13 हजार भाविक दर्शन घेतात. उत्पन्न एक कोटींवर गेले. सॅनिटायझेशनसाठी नवी उपकरणे व फिजिकल डिस्टन्सिंगची काळजी घेत, कोरोनाबाधित होणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या नियंत्रणात आणली. पूर्वीच्या तुलनेत निवांत दर्शन होत असल्याने, भाविकांच्या संख्येच्या तुलनेत दानपेटीतील रक्कम वाढली, असे निरीक्षण माजी खासदार सुब्बारेड्डी यांनी भेटीत नोंदविले. 

हेही वाचा - नगर जिल्हा परिषदेचे एवढे कर्मचारी बाधित

ते म्हणाले, ""लॉकडाउनपूर्वी रोज 70 हजार भाविक येत. रोजचे तीन कोटी रुपये उत्पन्न मिळायचे. जूनपासून आम्ही मंदिर खुले केले. दैनंदिन तीन हजार भाविकांना प्रवेश देऊन दर्शनबारी सुरू केली. आता ही संख्या 12 हजारांवर गेली. या काळात आमच्या 17 हजार कर्मचाऱ्यांपैकी 1100 कर्मचारी बाधित झाले. यात अवघ्या 30 रुग्णांना लक्षणे होती. दोन पुजाऱ्यांचे कोविडमुळे निधन झाले. मात्र, आम्ही केलेल्या विविध उपाययोजनांमुळे आता ही संख्या दोन आकड्यांत आहे. काल त्यात केवळ दोनने भर पडली.'' 
आमचे काही कर्मचारी डोंगराहून खाली गावात मुक्कामास जात. त्यांना तेथून बाधा होत असावी, असे आमच्या लक्षात आले. त्यानंतर आम्ही त्यांची देवस्थानातच मुक्कामाची व्यवस्था केली. ओझोनच्या सहाय्याने भाविकांचे निर्जंतुकीकरण करणारी आधुनिक यंत्रणा दर्शनबारीत बसविली. फिजिकल डिस्टन्सिंगकडे लक्ष दिले. आमच्या प्रयत्नांचे चांगले परिणाम दिसत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

दर्शनानंतरही भाविकांची विचारपूस 
माजी खासदार वाय. व्ही. सुब्बारेड्डी म्हणाले, ""तिरुपती दर्शनासाठी येऊन गेल्यानंतर पाच ते आठ दिवसांनी आम्ही रोज 200 भाविकांना फोन करतो. तुम्हास कोविड किंवा अन्य काही त्रास झाला का, असे विचारतो. देवाच्या कृपेने अद्याप तसे काही झाले नाही. फिजिकल डिस्टन्सिंग, ओझोनद्वारे सॅनिटायझेन व कमीत कमी वेळात दर्शन, तसेच निवास व्यवस्थेची वेगळ्या पद्धतीने काळजी आम्ही घेतो. साई संस्थानच्या अधिकाऱ्यांनी हे पाहण्यासाठी यावे, असे निमंत्रण आम्ही या भेटीत दिले.'' अहमदनगर

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: President of Tirupati Devasthan arrives in Shirdi