कोरोनाबाधितांची संख्या कमी झाल्याने एसटी बस वाढविण्याची मागणी

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 11 November 2020

कोरोना रुग्णसंख्येत घट झाली, आठवडे बाजार सुरू झाले, दिवाळी सणामुळे रस्त्यांवर वर्दळ वाढली. मात्र, पूर्वी येथे येणारी मुक्काम बस अद्याप बंदच आहे. 

पुणतांबे (अहमदनगर) : परिसरात कोरोनाबाधितांची संख्या सध्या घटली आहे. दिवाळी तोंडावर आल्याने प्रवाशांची संख्या मात्र वाढत आहे. त्यात पुरेशा एसटी बस उपलब्ध नसल्याने गैरसोय होत आहे. परिवहन मंडळाने या भागात बसची संख्या वाढवावी, अशी मागणी प्रवासी संघटनेचे अध्यक्ष विजय धनवटे यांनी केली आहे. या प्रश्नात कोपरगाव, श्रीरामपूरच्या आगारप्रमुखांनी लक्ष घालावे, अशी मागणी होत आहे.
 
या भागातून कोपरगाव, श्रीरामपूर आगाराच्या बस धावतात. लॉकडाउनमुळे बंद असलेली एसटी बससेवा आता सुरळीत सुरू झाली आहे. मात्र, ठराविक मार्गांवरच बस धावत असल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो. कोरोना रुग्णसंख्येत घट झाली, आठवडे बाजार सुरू झाले, दिवाळी सणामुळे रस्त्यांवर वर्दळ वाढली. मात्र, पूर्वी येथे येणारी मुक्काम बस अद्याप बंदच आहे. 

सकाळची शिर्डी- औरंगाबाद बस येत नाही. नऊनंतर बस धावण्यास सुरवात होते. त्यामुळे सकाळी लवकर जाणाऱ्या प्रवाशांना तिष्ठत थांबावे लागते. सणासुदीच्या काळासाठी जादा बसची गरज असल्याने त्यांची संख्या वाढवावी, अशी मागणी प्रवासी संघटनेच्या सदस्यांनी केली आहे. 

 

संपादन : सुस्मिता वडतिले


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: president of the travel association Vijay Dhanwate demanded that the transport board should increase the number of buses in the kopargaon and shrirampur area