esakal | कांद्याला इतका भाव मिळाल्यावर शेतकरी खूश होणारच ना, पारनेरमध्ये जल्लोष
sakal

बोलून बातमी शोधा

The price of onion in Parner is Rs. 6,400

कांदानिर्यात बंद असली तरी सध्या कांद्याचा देशात तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे कांद्याचे दर वाढले आहेत. दक्षिणेकडील राज्यांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे कांद्याचे नुकसान झाले आहे. देशातही कांद्याला मागणी वाढल्याने बाजार भाव वाढताना दिसत आहेत.

कांद्याला इतका भाव मिळाल्यावर शेतकरी खूश होणारच ना, पारनेरमध्ये जल्लोष

sakal_logo
By
मार्तंड बुचुडे

पारनेर  ः पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीत आज कांद्यास उच्चांकी बाजारभाव मिळाल्याने शेतक-यांमध्ये आनंदाचे वातावरण तयार झाले आहे. आज (ता. 16) झालेल्या कांदा लिलावामध्ये प्रथम क्रमांकाचा कांदा भाव खावून गेला. या वर्षीच्या हंगामातील हा पारनेर बाजार समितीमधील उच्चांकी बाजार भाव आहे. सोशल मीडियातही याची चर्चा सुरू आहे. वावर है तो पॉवर है,अशा प्रकारची घोषवाक्य त्यावर झळकत आहेत. काहीजण तर इतका भाव मिळाल्यावर शेतकऱ्याची पोरं कशाला शहरात जातील, अशी भावनिक टिपण्णीही केली जात आहे.

सध्या तालुक्यात वारेमाप पाऊस झाल्याने अनेकांचे कांदा पीक वाया गेले आहे. कांदा रोपेही खराब झाल्याने कांदा लागवडही करता आली नाही. तसेच आता काही ठराविक शेतक-यांकडेच कांदा शिल्लक आहे. आता कांद्याला चांगला बाजारभाव मिळत असल्याने ज्यांच्याकडे कांदा आहे, त्यांना आनंद झाला आहे. मात्र, अनेकांचे कांदा पीक वाया गेल्याने अनेक शेतकरी सध्या नाराज झाले आहेत.

आज कृषी उत्पन्न बाजार समितीत दोन हजार 148 कांदा गोण्यांची आवक झाली. तर प्रथम क्रमांकाच्या कांद्याला सहा हजार चारशे रूपये प्रत क्विंंटलचा दर मिळाला. तर दुस-या क्रमांकाच्या कांद्यास पाच हजार पाचशे तर त्या खालोखाल तीनहजार चारशे ते दोन हजार पाचशे रूपयांपर्यंत बाजारभाव मिळाला. या हंगामातील हा बाजार भाव उच्चांकी असल्याने आता बाजार वाढणार आहेत, या आशेने शेतकरी समाधानी झाले आहेत.

कांदानिर्यात बंद असली तरी सध्या कांद्याचा देशात तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे कांद्याचे दर वाढले आहेत. दक्षिणेकडील राज्यांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे कांद्याचे नुकसान झाले आहे. देशातही कांद्याला मागणी वाढल्याने बाजार भाव वाढताना दिसत आहेत.

यावर्षी अनेक राज्यातील कांदा पीक अती पावसामुळे वाया गेले आहे. त्यामुळे कांद्याचे उत्पादन घटले आहे. परिणामी आगामी काळात ही कांद्याचे दर वाढण्याची शक्यता आहे. 

संपादन - अशोक निंबाळकर