निर्यातबंदीनंतरही सोनईत कांद्याने भाव खाल्लाच

विनायक दरंदले
Saturday, 19 September 2020

आज दुपारी कांद्याचा लिलाव सुरु झाल्यानंतर सुरुवातीलाच तीन हजाराच्या पुढे लिलावाची बोली झाली. काही वेळातच भाव साडेतीन हजाराच्या पुढे गेला.

सोनई: केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी केल्यानंतरही नेवासे बाजार समितीच्या घोडेगाव येथील उपबाजारात आज शनिवारी कांद्याला चार हजार रुपयांचा भाव मिळाला आहे. समाधानकारक भावाने बळीराजा सुखावला आहे.

उपबाजारात आज तीस हजार ५५८ कांदा गोण्यांची आवक झाली होती. या आठवड्याच्या सुरुवातीला केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी केल्यामुळे मागील दोन लिलावात कांद्याचे भाव पाचशे ते सातशे रुपायांने घसरले होते. या नंतर राज्यातील अनेक भागात शेतकरी व शेतकरी संघटना आक्रमक झाल्या होत्या. केंद्राचा हा अन्यायकारी निर्णय केंद्राने मागे घ्यावा, अशी मागणी होत होती. मात्र, निर्यातबंदीबाबत कुठलाही निर्णय झाला नाही.

आज दुपारी कांद्याचा लिलाव सुरु झाल्यानंतर सुरुवातीलाच तीन हजाराच्या पुढे लिलावाची बोली झाली. काही वेळातच भाव साडेतीन हजाराच्या पुढे गेला. आज एक नंबर उन्हाळी कांद्याला साडेतीन ते चार हजार, दोन नंबरला अठ्ठाविसशे ते तेहतिसशे, मध्यम कांद्यास अडीच ते तीन हजार, गोल्टी कांद्यास दोन ते अडीच हजार तर जोड कांद्यास तिनशे ते पाचशेचा भाव मिळाला. आज उपबाजारात चार कोटी पंच्याहत्तर लाख ९५ हजार रुपायाची उलाढाल झाली, अशी माहिती सचिव देवदत्त पालवे यांनी दिली. अहमदनगर

संपादन - अशोक निंबाळकर
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The price of onion at Sonai is four thousand