प्राथमिक शिक्षक बँकेकडून गुरुजींना मिळणार वैद्यकीय कर्ज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Teachers Bank

अहमदनगर जिल्ह्यातील गुरुजींना आता आजारपणात प्राथमिक शिक्षक बँकेकडून दिलासा मिळणार आहे.

Teacher Loan : प्राथमिक शिक्षक बँकेकडून गुरुजींना मिळणार वैद्यकीय कर्ज

अहमदनगर - जिल्ह्यातील गुरुजींना आता आजारपणात प्राथमिक शिक्षक बँकेकडून दिलासा मिळणार आहे. सभासद शिक्षकांना वैद्यकीय कर्ज देण्याबाबत संचालक मंडळ विचाराधीन आहे. २ ते ५ लाखांपर्यंत हे वैद्यकीय कर्ज मिळू शकते. संचालक मंडळाच्या आगामी बैठकीत त्यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

प्राथमिक शिक्षक बँकेत पुन्हा सत्ता मिळवल्यानंतर गुरुमाऊली मंडळाने (तांबे गट) व आघाडीने सभासदांच्या मागणीनुसार जाहिरनाम्यातील आश्वासनाप्रमाणे निर्णय घेण्याचा धडाका लावला आहे. बापूसाहेब तांबे यांच्या मार्गदर्शनाखालील व अध्यक्ष संदीप मोटे यांच्या संचालक मंडळाने वैद्यकीय कर्जाबाबत निर्णय घेतल्यास जिल्ह्यातील ११ हजार सभासद शिक्षकांना लाभ होणार आहे.

नूतन संचालकांनी पहिल्याच बैठकीत कर्जावरील व्याजदर कमी केला होता. सर्वच कर्जांवर ०.२० टक्के व्याज दर कमी झाल्याने सभासदांना सुखद धक्का बसला होता. त्यामुळे गृहकर्ज, वाहन कर्ज व शैक्षणिक कर्ज ८ टक्के झाले आहे. जामीन कर्जासाठी साडेआठ टक्के व्याजदर आहे. एकीकडे कर्जावरील व्याजदर कमी करताना ठेवींवर जादा व्याज देण्याचा निर्णय बँकेचे अध्यक्ष मोटे यांनी घेतला आहे.

शिक्षक बँकेत तब्बल १ हजार ३०७ कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. त्यात बिगर सभासदांच्या ९०० कोटी रुपयांच्या ठेवींचा समावेश आहे. ९२५ कोटी रुपयांचे कर्जवाटप झाले आहे. ते केवळ सभासद शिक्षकांना दिले जाते. मृतांचे कर्ज माफ केले जाते. त्यांच्या वारसांना मयत निधीतून ५ लाखांचे अर्थसाह्य, कुटुंब आधारमधून १० लाखांचे साह्य, २५ हजारांपर्यंत विनापरवाना वैद्यकीय मदत दिली जाते. आता मेडिकल लोनमुळे सभासदांना आणखी आधार मिळेल.

बँकेत जाण्याची गरज नाही

एखादा शिक्षक आजारी पडल्यानंतर त्याला पैशांची अडचण भासू शकते. हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यानंतर त्याला बँकेत कर्जासाठी उपस्थित राहता येत नाही. तो उपस्थित राहू न शकल्याने कर्जही दिले जात नव्हते. परंतु आता त्याला स्वतः बँकेत येण्याची गरज भासणार नाही. आजारपणाच्या काळातच त्याला लोन मिळू शकते. वैद्यकीय कागदपत्रे तपासून २ ते ४ लाखांपर्यंत कर्ज देण्याच्या हालचाली सुरू आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षकांमधून ही मागणी आहे.

टॅग्स :BankMedicalteacherloans