पवारांनी मध्यस्ती केल्याशिवाय उसतोड कामगारांचा संप मिटणार नाही

सूर्यकांत नेटके
Friday, 18 September 2020

राज्यातील ऊसतोडणी मजुरांचा तोडणी दर करार संपल्याने नव्याने करार करून प्रतिटन किमान पाचशे रुपये दर मिळावा, मुकादमांच्या कमिशनमध्ये वाढ करावी

नगर : ऊसतोडणी कामगारांच्या तोडणी दरात वाढ करावी, यासह इतर मागण्यांसाठी ऊसतोडणी कामगार संघटनांनी यंदा संप पुकारला आहे. तोडणी कामगार व साखर संघाच्या अध्यक्षांची याबाबत बैठक झाली.

ऊसतोडणी कामगारांच्या मागण्यांबाबत शरद पवार यांनी लक्ष घालून तोडगा काढावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य ऊसतोडणी कामगार संघटनेचे अध्यक्ष गहिनीनाथ थोरे यांनी बैठकीत केली आहे. इतर संघटनांनीही तशी मागणी केल्याने, पवार यांच्या मध्यस्थीने लवकरच ऊसतोडणी कामगारांच्या प्रश्नावर तोडगा निघेल, असे थोरे म्हणाले. 

राज्यातील ऊसतोडणी मजुरांचा तोडणी दर करार संपल्याने नव्याने करार करून प्रतिटन किमान पाचशे रुपये दर मिळावा, मुकादमांच्या कमिशनमध्ये वाढ करावी, यासह इतर मागण्यांसाठी यंदा मजुरांच्या संघटनांनी संप पुकारला आहे. याबाबत साखर संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांच्या उपस्थितीत नुकतीच बैठक झाली. 

थोरे म्हणाले, ""बैठकीत साखर कारखाने अडचणीत असल्याची भूमिका साखर संघाच्या अध्यक्षांनी मांडतानाच, मजुरांना योग्य न्याय मिळेल असे सांगितले. त्यानंतर शरद पवार यांनी यात लक्ष घालून, मजुरांच्या तोडणी दरात योग्य वाढ करावी, अशी अपेक्षा साखर संघ आणि मजुरांच्या संघटनांनी व्यक्त केली.

या बैठकीनंतर आम्ही शरद पवार यांचीही भेट घेऊन, ऊसतोडणी कामगारांना दरवाढ देऊन करार करण्यासाठी पुढाकार घेण्याची विनंती केली. ती पवार यांनी मान्य केली आहे. त्यामुळे पवार यांचाच लवाद महत्त्वाचा असेल, असे थोरे म्हणाले. 

हार्वेस्टरला देता, मग 
मजुरांना तो दर का नाही? 

मजुरांना पहिल्या किलोमीटरला प्रतिटन किमान पाचशे रुपये मिळावेत, या मागणीवर सगळ्याच संघटना ठाम आहेत. हार्वेस्टरला पाचशे रुपये देता, मग मजुरांना का नाही, असा प्रश्न तोडणी कामगार संघटनांच्या प्रतिनिधींनी उपस्थित केला. 

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The problem of sugarcane will be solved only because of Sharad Pawar