फोटो कसला काढतो, मलाच फोटोत जाण्याची वेळ आलती

आनंद गायकवाड
Friday, 23 October 2020

या क्षणाचा साक्षीदार असलेल्या, पाठीमागून आलेल्या दुचाकीस्वाराने त्यांना दिलासा दिला. याबाबत त्यांनी परिसरातील दुकानदार व रहीवाश्यांना कल्पना दिली.

संगमनेर ः नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे मॉर्निंग वॉकसाठी प्रवरा नदीवरील गंगामाई घाटाकडे दुचाकीवर निघालेल्या प्राध्यापकांच्या दुचाकीला पूर्ण वाढ झालेला बिबट आडवा गेला.

संगमनेर शहराच्या जवळ, वर्दळीच्या ठिकाणी अनपेक्षितपणे समोर आलेल्या बिबट्याने त्यांची मात्र पाचावर धारण बसवली. हा अनुभव त्यांनी समाजमाध्यमावर टाकल्याने या प्रकाराची चांगलीच चर्चा झाली.
मंगळवार ( ता. 20 ) रोजी सकाळी सव्वासातच्या सुमारास शहरातील प्रा. ओंकारनाथ बिहाणी नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकसाठी निघाले होते.

दुचाकीवर प्रवराकाठच्या गंगामाई घाटापर्यंत जावून तेथून मित्रपरिवारासह पायी जाण्याचा त्यांचा दोन वर्षांपासूनचा शिरस्ता आहे. सकाळी सव्वासातच्या सुमारास ते आपल्या दुचाकीवरुन मालपाणी हेल्थ क्लबच्या दररोजच्या रस्त्याने गंगामाई घाटाकडे निघाले होते.

सकाळच्या प्रसन्न वातावरणात आपल्याच तंद्रीत जात असताना, घोडेकर मळा ओलांडला आणी दोनशे फुटांच्या अंतरावर त्यांनी प्रतिक्षिप्त क्रिया म्हणून, दुचाकीचे ब्रेक लावले. त्याच क्षणी त्यांच्या दुचाकीसमोरुन अवघ्या दोन फुटांवरुन डावीकडून उजवीकडे रस्ता ओलांडून, पूर्ण वाढ झालेला ऐटीत बिबट्या शेतातून निघून गेला.

क्षणभर काळच थांबल्याचा भास प्रा. बिहाणींना झाला. मनात असंख्य विचारांची वादळे घोंघाऊ लागली, ब्रेक मारायला एक सेकंदाचा उशिर झाला असता तर.... त्यांची दुचाकी बिबट्यावर धडकली असती. त्यानंतरच्या परिणामांच्या कल्पनेने त्यांचा क्षणभर थरकाप उडाला.

या क्षणाचा साक्षिदार असलेल्या, पाठीमागून आलेल्या दुचाकीस्वाराने त्यांना दिलासा दिला. याबाबत त्यांनी परिसरातील दुकानदार व रहीवाश्यांना कल्पना दिली. वाड्या-वस्त्यांवर राहणाऱ्या लोकांना नेहमीच बिबट्याचे दर्शन होते, पण शहराच्या इतक्या जवळ, भरवस्तीत व तेही दिवसाउजेडी त्याचे दर्शन झाल्याने सगळ्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि थोडेसे भीतीचेही भाव होते. 

गंगामाईवर पोचल्यावर त्यांनी याबाबत त्यांचे मित्र प्रदीप मालाणी व ओमप्रकाश आसावा यांना सांगितले. प्रथम विनोद म्हणून व नंतर या प्रसंगातील गांभीर्य समजल्याने सर्व अवाक् झाले. जगदीश इंदानी व नीलेश जाजू म्हणाले.. फोटो तरी काढायचा.. त्यांना कसं सागायचं फोटो काढीत बसलो असतो तर, मीच कदाचित फोटोत गेलो असतो.

वन्यप्राण्यांच्या नैसर्गिक अधिवासावर जालेल्या मानवी अतिक्रमणामुळे अनेक प्राणी भक्ष्याच्या शोधार्थ मानवी वस्तीच्या आसपास येत आहेत. संगमनेर सारख्या गजबजलेल्या शहराजवळ भरदिवसा त्यांचे होणारे दर्शन हा त्याचाच परिणाम आहे. निसर्ग व पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी वृक्षलागवड करण्याचा संदेश देत प्रा. बिहाणी यांनी परिसरातील रहिवाशी व या निवंत रस्त्यावरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे.
संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The professor was frightened by the leopard