राष्ट्रवादीची शेतकरी कायद्याविरोधात बाजार समितीसमोर निदर्शने

दत्ता इंगळे
Saturday, 5 December 2020

मार्केट यार्ड चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आंदोलनाची सुरवात करण्यात आली.

नगर तालुका : केंद्र सरकारने शेतकऱ्यांवर लादलेल्या अन्यायकारक कायद्याच्या निषेधार्थ जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर निदर्शने करण्यात आली. दिल्लीतील शेतकरी आंदोलनास पाठिंबा देऊन शेतकरीविरोधी कायदे रद्द करण्याची मागणी या वेळी करण्यात आली. 

राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात प्रदेश उपाध्यक्ष घनश्‍याम शेलार, शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, जिल्हा युवक कार्याध्यक्ष संजय कोळगे, शारदा लगड, प्रदेश सरचिटणीस अंबादास गारुडकर, किसनराव लोटके, उद्धव दुसुंगे, सुहास कासार, केशव बेरड, रत्नाकर ठाणगे यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते. 

मार्केट यार्ड चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आंदोलनाची सुरवात करण्यात आली. राजेंद्र फाळके म्हणाले, ""भाजप सरकार आडमुठी भूमिका घेऊन शेतकऱ्यांशी चर्चा करीत असून, प्रश्‍न सोडविण्यास तयार नाही. शेतकऱ्यांचे आंदोलन दडपण्याची तयारी भाजप सरकारने चालविली आहे.

हजारो शेतकरी रस्त्यावर उतरलेले असतानादेखील केंद्र सरकार डोळेझाक करीत आहे. शेतकऱ्यांचे प्रश्‍न न सोडवता, मूठभर भांडवलदारांच्या फायद्यासाठी शेतकरीविरोधी धोरण राबविले जात आहे.'' 
.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Protests in front of the Market Committee against the Farmers Act