गरज पडल्यास घरकुलासाठी अन्यत्र जागा उपलब्ध करून द्या

अमित आवारी 
Friday, 4 December 2020

केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना आणि राज्य पुरस्कृत विविध आवास योजनांना गतिमान करण्यासाठी आणि गुणवत्तावाढीसाठी राज्यात महाआवास अभियान राबविण्यात येत आहे.

अहमदनगर : केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना आणि राज्य पुरस्कृत विविध आवास योजनांना गतिमान करण्यासाठी आणि गुणवत्तावाढीसाठी राज्यात महाआवास अभियान राबविण्यात येत आहे. त्याची जिल्ह्यात योग्य प्रकारे अंमलबजावणी करावी आणि जिल्हा राज्यात अग्रेसर राहण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी केले. 

महाआवास अभियान राबविण्यासंदर्भात विभागस्तरीय कार्यशाळा झाली. विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी तीत मार्गदर्शन केले. त्यानंतर जिल्ह्यातील गटविकास अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांनी अभियानाच्या अंमलबजावणीबाबत सूचना दिल्या. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, अपर जिल्हाधिकारी पी. एल. सोरमारे, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक आदी या वेळी उपस्थित होते. 

आवास योजनेत जिल्ह्याला मिळालेले उद्दिष्ट, त्यातील किती घरकुलांना मंजुरी दिली, उर्वरित घरकुलांच्या मंजुरीत येणाऱ्या तांत्रिक अडचणी तालुकानिहाय आढावा जिल्हाधिकाऱ्यांनी गटविकास अधिकाऱ्यांकडून घेतला. प्रत्येक गावातील गावठाणात असलेल्या गायरान व मोकळ्या जागा किती आहेत, त्या गावासाठी मंजूर घरकुले, अतिक्रमण असलेली; परंतु नियमानुकूल करण्यात आलेली घरकुले, ज्या ठिकाणी नियमानुकूल करण्यात अडचणी असतील, तेथे अन्यत्र जागा उपलब्ध करून घ्याव्यात, अशा सूचना त्यांनी केल्या. हे काम गतिमान पद्धतीने होणे आवश्‍यक आहे.

महाआवास अभियान राबविण्यात राज्यात अव्वल राहू, अशा पद्धतीने काम करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. योजनेची प्रभावी अंमलबजावणी होण्याच्या दृष्टीने सहभागी यंत्रणांची तालुकास्तरीय कार्यशाळा आयोजित करण्याची सूचनाही त्यांनी केली. 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Provide space elsewhere for the household if needed