दशक्रिया विधी करण्यासाठी पुरोहित संघाने केले सात नियम जाहीर

आनंद गायकवाड
Wednesday, 23 September 2020

भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ मानून शासकिय नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. दशक्रियेसारखा मानवी जीवनातील महत्वाचा धार्मिक विधी करताना कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सात नियमांचे पालन करण्याचे आवाहन संगमनेर येथील पुरोहित संघाने फलकाच्या माध्यमातून केले आहे.

संगमनेर (अहमदनगर) : भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ मानून शासकिय नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. दशक्रियेसारखा मानवी जीवनातील महत्वाचा धार्मिक विधी करताना कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सात नियमांचे पालन करण्याचे आवाहन संगमनेर येथील पुरोहित संघाने फलकाच्या माध्यमातून केले आहे.
 
मानवी भावभावनांशी निगडीत असलेल्या जन्म व मृत्यू या अटळ घटना आहेत. त्यातही घरातील एखाद्या सदस्यांचा मृत्यू अत्यंत क्लेषदायक असला तरी, त्याला व त्यानंतरच्या धार्मिक क्रियांना सामोरे जावेच लागते. मात्र कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर या सर्व क्रियांना चाप लागला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शारिरीक अंतर, मास्कचा वापर आणि हात वारंवार धुणे गरजेचे आहे. त्यामुळे दशक्रियेसारख्या कौटुंबिक समारंभातही गर्दी टाळणे सर्वांच्या हिताचे असल्याने, सामाजिक कर्तव्यभावनेतून पुरोहित संघाने फलकाद्वारे जनजागृती करण्याचा प्रयत्न केला आहे. यासाठी प्रवरा नदीच्या तीरावरील केशवतीर्थ येथे सात मुद्द्यांचे मार्गदर्शन करणारा फलक उभारला आहे.
 
दशक्रिया विधीसाठी परिवारातील सदस्य व अत्यंतजवळचे मोजकेच नातेवाईक यांची उपस्थिती असावी. प्रत्येकाने मास्कचा वापर करावा आणि एकमेकांपासून दूर बसावे. सॅनिटायझरची व्यवस्था आवर्जून करावी. लहान मुले तसेच वृध्द, गर्भवती महिला व आजारी व्यक्तींना विधीसाठी बोलावू नये. परिसरात कोठेही कोणीही थुंकू नये. काही वेळा एकाच वेळी अनेक विधी असतात, त्यावेळी आपसात समजूतदारपणा दाखवावा, गर्दी वाढणार नाही याची सर्वांनी दक्षता घ्यावी. आदी महत्वाच्या मुद्द्यांचा या फलकात समावेश असल्याची माहिती पुरोहित संघाचे अध्यक्ष भाऊ जाखडी यांनी दिली. सर्वांच्या सुरक्षिततेची काळजी घेणे ही दिवंगत व्यक्तीला भावपूर्ण कृतीशील श्रद्धांजली ठरेल. त्यामुळे सर्वांच्या हितासाठी या सर्व बाबींचे काटेकोर पालन करण्याची विनंती पुरोहीत प्रतिष्ठानने केली आहे. यावेळी संदीप वैद्य, महेश मुळे, योगेश म्हाळस, सागर काळे आदी उपस्थित होते.

संपादन : सुस्मिता वडतिले


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Purohit Sangh has appealed to follow the seven rules through the poster to perform the Dashakriya ritual