
सामानाची उचकापाचक करीत, घरातील रोख 50 हजार रुपये, सहा तोळे सोने, असा 3 लाख 18 हजारांचा ऐवज लुटून चोर पसार झाले.
कोपरगाव (अहमदनगर) : ओगदी येथील शेतकरी लक्ष्मण जोरवर रात्री शेतात पाणी भरण्यासाठी गेले असता, घरातील महिलांवर हल्ला करून चोरांनी सव्वातीन लाखांचा ऐवज लुटला. त्यात कमलबाई जोरवर जखमी झाल्या. शुक्रवारी मध्यरात्री ही घटना घडली.
याबाबत माहिती अशी की, लक्ष्मण जोरवर शेतात पाणी भरण्यासाठी गेल्यानंतर चोरांनी घराचे दार दगडी पाट्याने तोडून आत प्रवेश केला. घरात झोपलेल्या कमलबाई लक्ष्मण जोरवर (वय 45) यांना लाकडी दांडक्याने जबर मारहाण करून गंभीर जखमी करत दहशत निर्माण केली. सामानाची उचकापाचक करीत, घरातील रोख 50 हजार रुपये, सहा तोळे सोने, असा 3 लाख 18 हजारांचा ऐवज लुटून चोर पसार झाले.
कमलबाई यांनी आरडाओरडा केला; मात्र चोरांनी शेजाऱ्यांच्या घरांना बाहेरून कड्या लावल्या होत्या. दरम्यान, माहिती समजताच पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी घटनास्थळी भेट दिली.