esakal | पुणे विद्यापीठाच्या प्रश्‍नपत्रिका पोहोचल्या एक ते सात तास उशीरा
sakal

बोलून बातमी शोधा

Question papers of Pune University arrived one to seven hours late

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा सोमवारपासून सुरु झाल्या. परंतु, पहिल्याच दिवशी विद्यापीठाच्या सावळ्या गोंधळाचा फटका विद्यार्थ्यांना बसला.

पुणे विद्यापीठाच्या प्रश्‍नपत्रिका पोहोचल्या एक ते सात तास उशीरा

sakal_logo
By
विलास कुलकर्णी

राहुरी (अहमदनगर) : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा सोमवारपासून सुरु झाल्या. परंतु, पहिल्याच दिवशी विद्यापीठाच्या सावळ्या गोंधळाचा फटका विद्यार्थ्यांना बसला.

निर्धारित वेळेपेक्षा एक ते सात तास उशिरा प्रश्नपत्रिका महाविद्यालयांना पोहोचल्या. काही विषयांच्या प्रश्नपत्रिका काही महाविद्यालयांना दिवसभर पोहोचल्याच नाहीत. काही प्रश्नपत्रिका अर्ध्या मराठी, अर्ध्या इंग्रजी भाषेत; तर काही प्रश्नपत्रिका समजण्या पलिकडच्या लिपीत होत्या. त्यामुळे, महाविद्यालयात दिवसभर उपाशी बसूनही अनेक विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित राहावे लागले.

सोमवारी सकाळी दहा वाजल्यापासून पुणे विद्यापीठाकडून ई-मेलद्वारे महाविद्यालयांना प्रश्नपत्रिका पाठविण्याचे काम सुरू झाले. परंतु, त्यात प्रचंड गोंधळ उडाला. बीएस्सीच्या (कम्प्युटर सायन्स) द्वितीय वर्षाच्या अप्लाइड अल्जेब्रा विषयाच्या प्रश्नपत्रिकेचा ई-मेल काही महाविद्यालयांना दिवसभर पोहोचलाच नाही. काही महाविद्यालयांना एक ते सात तास उशिरापर्यंत प्रश्नपत्रिका पोहोचल्या. त्यात, प्रश्नपत्रिकेवर विषयाचे नाव अल्जेब्रा आणि प्रश्न विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे आले.

एमबीएच्या अंतिम वर्षाच्या सकाळी दहा व दुपारी चार वाजताच्या दोन प्रश्नपत्रिका काही महाविद्यालयात दिवसभर पोहोचल्याच नाहीत. एम. ए. अंतिम वर्षाची इतिहास विषयाची प्रश्नपत्रिका सकाळी दहा ऐवजी सायंकाळी चार वाजता आली. तीही मराठी ऐवजी इंग्रजी भाषेत आली. एम. ए. मराठी विषयाचा अर्धा पेपर मराठीत तर अर्धा इंग्रजीत आला. 
काही प्रश्नपत्रिका युनिकोड मध्ये नसल्याने, मराठी भाषेतील प्रश्नपत्रिका इंग्रजी व अगम्य अशा वाचता न येणाऱ्या भाषेत मेल द्वारे पोहोचल्या. त्यामुळे, सकाळी आठ वाजल्यापासून आलेले विद्यार्थी दिवसभर उपाशी राहून सायंकाळी पाच वाजता परीक्षा न देता घरी परतले. 

'बीसीएस' च्या अल्जेब्रा विषयाची प्रश्नपत्रिका एक तास उशिरा मिळाली. परंतु, या प्रश्नपत्रिकेवर मराठी भाषेत विधी महाविद्यालयातील विषयाचे कायद्याचे प्रश्न होते. दुपारी एक ते दोन चे सर्व विषयांचे पेपर सायंकाळी चार वाजता झाले. 
- नितीन वाळुंज, परीक्षा नियंत्रक, राहुरी महाविद्यालय 

संपादन : अशोक मुरुमकर

loading image