भरला बुवा एकदाचा अर्ज! शेवटच्या दिवशी अर्ज भरण्यासाठी तहसील कार्यालयासमोर इच्छुकांच्या रांगा 

दत्ता इंगळे
Wednesday, 30 December 2020

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आज शेवटचा दिवस असल्याने इच्छुकांची धांदल उडाली. अर्ज दाखल करण्यासाठी निवडणूक असलेल्या प्रत्येक गावाच्या टेबलसमोर रांगा लागल्या होत्या. 

अहमदनगर : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आज शेवटचा दिवस असल्याने इच्छुकांची धांदल उडाली. अर्ज दाखल करण्यासाठी निवडणूक असलेल्या प्रत्येक गावाच्या टेबलसमोर रांगा लागल्या होत्या. 

नगर तालुक्‍यातील 59 गावांच्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची आज शेवटची मुदत होती. त्यामुळे तालुक्‍यातील बहुतेक नेते व कार्यकर्ते आज दिवसभर तहसील परिसरात आवर्जून उपस्थित होते. अनेक गावांतील उमेदवारांनी एकत्रीत आपल्या पॅनेलचे अर्ज दाखल करण्यावर भर दिला. निवडणूक निर्णय अधिकारी, तथा तहसीलदार उमेश पाटील, सहायक अधिकारी अभिजीत बारवकर हे निवडणूक प्रक्रियेवर लक्ष ठेवून होते. ध्वनिक्षेपकावरून उमेदवारांसाठी आवश्‍यक सूचना देत होते. 

राज्य आदर्शगाव प्रकल्प व संकल्प समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांनी आदर्शगाव हिवरेबाजार ग्रामपंचातीसाठी आज सातव्यांदा अर्ज दाखल केला. जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य कालिंदी लामखडे (निंबळक), बाजार समितीचे सभापती अभिलाष घिगे (तांदळी वडगाव), प्रवीण कोकाटे (चिंचोडी पाटील), पंचायत समितीचे माजी सदस्य दत्ता पाटील सप्रे, डॉ. बबन डोंगरे (नवनागापूर) यांनी उमेदवारीअर्ज दाखल केले. अर्जाची छाननी उद्या (ता.31) होणार आहे. 

कर्मचाऱ्यांचे उत्तर रात्रीपर्यंत काम 
उमेदवारीअर्ज संकेतस्थळावर अपलोड करताना वारंवार संकेतस्थळ बंद पडत होते. त्यामुळे मंगळवारी रात्री उशिरापर्यंत निवडणूक कर्मचाऱ्यांना उमेदवारांचे अर्ज संकेतस्थळावर दाखल करावे लागले. 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Queue of aspirants in front of tehsil office on the last day to fill up the application